Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : अखेर विश्व मराठी संमेलनाचा कार्यक्रम जाहीर
By श्रीकिशन काळे | Updated: January 28, 2025 16:36 IST2025-01-28T16:35:35+5:302025-01-28T16:36:51+5:30
विश्व मराठी संमेलनाच्या सोशल मीडियावरील पेजवर कार्यक्रमपत्रिका आज प्रसिध्द करण्यात आली.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : अखेर विश्व मराठी संमेलनाचा कार्यक्रम जाहीर
पुणे : मराठी भाषा विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात होणाऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली. संमेलन दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना कार्यक्रम नेमके काय होणार, ते सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे संमेलनाविषयी साहित्य वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. पण मंगळवारी (दि.२८) संमेलनाची कार्यक्रमपत्रिका प्रसिध्द करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी विश्वसंमेलनाची माहिती दिली. पण त्यामध्ये नेमके कार्यक्रम काय असतील, त्याविषयी काहीही सांगितले नव्हते. मंगळवारी विश्व मराठी संमेलनाच्या सोशल मीडियावरील पेजवर कार्यक्रमपत्रिका आज प्रसिध्द करण्यात आली. त्यामध्ये ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता बालगंधर्व रंगमंदिरपासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात येईल. सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार असून, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना साहित्यभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच संगीतकार कौशल इनामदार यांचा ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हा कार्यक्रम होईल.
दुपारी सव्वा वाजता ‘माझी मराठी भाषा अभिजात झाली’ यावर परिसंवाद, पुस्तक प्रकाशन आदी कार्यक्रम हाेतील. त्यात डॉ. सदानंद मोरे, ज्ञानेश्वर मुळे, लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे सहभागी होणार आहेत. त्यानंतर ‘मराठी भाषा आणि प्रसारमाध्यमे’यावर संपादकांचा परिसंवाद असेल. दुपारी ३.३० वाजता नव्या जुन्यांचे कवी संमेलन रंगेल. सायंकाळी ५.४५ वाजता आंतरराष्ट्रीय मंच उपक्रमांचे सादरीकरण व विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होतील. हे कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंच येथे होतील. दुपारी प्र. के. अत्रे सभागृह (ॲम्फी थिएटर)मध्ये दुपारी २ वाजता मराठी बोलींच्या सर्वेक्षणाबाबत डॉ. सोनल कुलकर्णी सादरीकरण करतील. तर ३.१५ वाजता अनुवाद विषयक चर्चासत्र होणार आहे. त्यात रवींद्र गुर्जर, डॉ. उमा कुलकर्णी, लीना सोहनी सहभागी होत आहेत.