मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार - अजित पवार

By निलेश राऊत | Updated: December 23, 2023 10:49 IST2023-12-23T10:49:44+5:302023-12-23T10:49:59+5:30

भिडेवाडा येथे जागेची मर्यादा लक्षात घेता तज्ज्ञांशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात येईल.

Ajit Pawar will set up a memorial in Bhidewada to inspire education for girls | मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार - अजित पवार

मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार - अजित पवार

पुणे - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या स्थळाचे महत्व लक्षात घेता मुलींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून  शिक्षणाची प्रेरणा मिळेल, असे स्मारक भिडेवाडा येथे उभारण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पवार यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा, महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेस भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर आदी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, भिडेवाडा येथे जागेची मर्यादा लक्षात घेता तज्ज्ञांशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात येईल. पुढच्या पिढीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य लक्षात रहावे आणि याठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू झाली हे कळावे या पद्धतीने सर्व स्मारकाची रचना करण्याचा प्रयत्न आहे. बाहेरून पुरातन वास्तू दिसावी आणि आतल्या बाजूस विद्यार्थीनी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा असाव्यात असा प्रयत्न राहील. वाहनतळासाठीदेखील व्यवस्था करण्याबाबत परिसरातील जागेचा उपयोग करता येतो का याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार
महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासंदर्भात पवार म्हणाले, अडीच एकर क्षेत्रावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात आले असून, याठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. तर महात्मा फुलेवाडा १९९३ मध्ये उभारण्यात आला आहे. आता दोन्ही भाग एकत्र करून विस्तृत स्वरुपाचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याचा शासनाचा मनोदय आहे. त्यासाठी काही कुटुंबांना स्थलांतरीत करावे लागेल.  मात्र त्यांचे  चांगले पुनर्वसन व्हावे, त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. रहिवाशांना आवश्यक सुविधा आणि पर्यायी जागा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. राज्य शासन आणि महापालिका मिळून पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकूण पाऊणेचार एकर क्षेत्रात जागतिक दर्जाचे स्मारक उभारेल, असे पवार यांनी सांगितले 

Web Title: Ajit Pawar will set up a memorial in Bhidewada to inspire education for girls