"तुम्ही वेडे आहात, त्याच्या शहरात २१ दिवस..."; क्षीरसागरांबाबत प्रश्न विचारताच अजितदादा संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 19:02 IST2025-02-16T19:00:17+5:302025-02-16T19:02:37+5:30
संदीप क्षीरसागर यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.

"तुम्ही वेडे आहात, त्याच्या शहरात २१ दिवस..."; क्षीरसागरांबाबत प्रश्न विचारताच अजितदादा संतापले
Ajit Pawar on Sandeep Kshirsagar : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण चांगलेच तापलं आहे. शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी ही हे प्रकरण लावून धरलं आहे. अशातच संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. या भेटीवरुन विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. माध्यमांनी या भेटीबाबत प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.
शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. संदीप क्षीरसागर यांनी दुसऱ्यांदा अजित पवार यांची भेट घेतल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आलं. मात्र त्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीचे कारण सांगितले. तर दुसरीकडे, माध्यमांनी अजित पवार यांच्याकडेही या भेटीबाबत विचारणा केली. संदीप क्षीरसागर यांच्यासोबत कोणत्या विषयांवर चर्चा झाली असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्यावर अजित पवार पत्रकारांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही वेडे आहात, असं अजित पवार यांनी सुनावलं.
"तुम्ही ना इतके वेडे आहात. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. तो विरोधी पक्षाचा आमदार जरी असला तरी त्याच्या शहरामध्ये २१ दिवस प्यायचे पाणी नाही. तेच सांगण्यासाठी तो आला होता की, दादा याच्यातून काहीतरी मार्ग काढा. मी त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहे. पालकमंत्री आहे म्हणून लोकप्रतिनिधी येऊन भेटणारच ना. मी विरोधी पक्षात असताना चंद्रकांत पाटील पालकमंत्री होते तेव्हा त्यांना भेटायचो," असं अजित पवार म्हणाले.
संदीप क्षीरसागरांचे स्पष्टीकरण
अजित पवार यांनी भेट घेतल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी एक्स पोस्ट करत भेटीची माहिती दिली. "बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, याविषयी शासन पातळीवर मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. आज पुन्हा एकदा या विषयी राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे भेट घेतली. पालकमंत्री अजित पवार यांनी याविषयी विद्युत विभागाचे व्यवस्थापकीय संचालक यांना तातडीने फोन करून या विषयी तत्काळ मार्ग काढावा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे बीडकरांना या उन्हाळ्यापूर्वी सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहेच, यातून नक्कीच मार्ग निघेल व माझ्या अनेक वर्षांच्या पाणीपुरवठ्याच्या सर्वप्रकारच्या कामाला यश मिळाले," असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं.