Malegaon Nagar Parishad Election Result 2025:पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बारामती, इंदापूर आणि भोरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रवादीने झेंडा फडकवला असला तरी, सर्वांचे लक्ष लागलेल्या माळेगाव नगरपंचायतीत मात्र विजयासोबतच एका मोठ्या राजकीय संघर्षाची चर्चा पाहायला मिळत आहे.
माळेगावात युतीची सत्ता, पण अपक्षांची हवा
माळेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच ऐतिहासिक निवडणुकीत अजित पवारांनी त्यांचे कट्टर विरोधक रंजन तावरे यांच्याशी युती करून राजकीय धक्का दिला होता. या निवडणुकीचे मुख्य आकर्षण ठरलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुयोग सातपुते यांनी ११ हजार मतांच्या आघाडीसह दणदणीत विजय मिळवला. माळेगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) ८ जागा मिळाल्या आहेत. तर रंजन तावरे यांच्या जनमत विकास आघाडीला ३ जागा मिळाल्या आहेत. भाजप व राष्ट्रवादी पुरस्कृत प्रमोद तावरे हे देखील या निवडणुकीत निवडून आले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे माळेगावात अपक्ष उमेदवारांच्या माळेगाव विकास आघाडीने ५ जागांवर विजय मिळवला आहे. अजित पवारांच्या विरोधात शरद पवार गट आणि स्थानिक नेत्यांनी लावलेल्या ताकदीमुळे राष्ट्रवादीला सर्वच्या सर्व १७ जागा जिंकण्यात अपयश आले. दीपक तावरे यांच्या नेतृत्वाखालील ५ अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवत अजितदादांच्या गडाला खिंडार पाडले आहे.
प्रभाग ९ मध्ये ईश्वरचिट्ठीचा कौल
माळेगावमधील प्रभाग ९ ची लढत अंगावर काटा आणणारी ठरली. गायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या दोन्ही उमेदवारांना ६१६-६१६ अशी समान मते पडली. शेवटी ईश्वरचिट्ठी काढण्यात आली, ज्यात नशिबाने साथ दिल्याने अपक्ष उमेदवार जयश्री तावरे यांना विजयी घोषित करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील इतर महत्त्वाचे निकाल
इंदापूर: हर्षवर्धन पाटलांना धक्का देत इंदापूर नगरपालिकेत अजित पवार गटाने बाजी मारली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा यांनी भाजपच्या प्रदीप गारटकर यांचा अवघ्या १२० मतांनी पराभव केला. या निकालामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.
भोर: संग्राम थोपटेंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग भोरमध्येही नाट्यमय निकाल पाहायला मिळाला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार रामचंद्र आवारे १७० मतांनी विजयी झाले. इथे भाजपचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. पण नगराध्यक्ष मात्र राष्ट्रवादीचा निवडून आला आहे. यामुळे आमदार संग्राम थोपटे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
बारामती: बारामती नगरपरिषदेत पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादीची आघाडी पाहायला मिळाली. अनुप्रिता तांबे यांची बिनविरोध निवड झाली. तर अविनाश निकाळजे आणि मनीषा चव्हाण यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.
तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार; अजित पवारांनी दिला होता इशारा
माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी निधीवरुन भाष्य केलं होतं. "अर्थ मंत्रालय माझ्याकडे आहे परंतु वाटप करत असताना जसं पंगत बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटतं तसं वाढपी तुमच्या समोर उभा आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि चौदाशे कोटी रुपयांचा निधी माझ्याकडे आहे. तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार निवडून दिले तर तुम्ही सांगितलेलं सगळं द्यायला मी तयार आहे. पण तुम्ही तिथे काठ मारली तर मी पण काठ मारणार. तुमच्या हातामध्ये मत द्यायचं आहे माझ्या हातात निधी द्यायचा आहे. मग बघा काय ते," असा इशारा अजित पवार यांनी दिला होता.
Web Summary : Despite NCP's dominance in Pune, Malegaon saw a close contest. Ajit Pawar's alliance won, but independents secured significant seats, challenging his authority. Close contests and fund allocation warnings marked the election.
Web Summary : पुणे में राकांपा के दबदबे के बावजूद, मालेगांव में कांटे की टक्कर हुई। अजित पवार का गठबंधन जीता, लेकिन निर्दलियों ने महत्वपूर्ण सीटें हासिल कर उनकी सत्ता को चुनौती दी। करीबी मुकाबले और धन आवंटन की चेतावनी चुनाव की विशेषता रही।