मुंडेंवरील कारवाईबाबत चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; अजित पवार यांची भूमिका
By नितीन चौधरी | Updated: February 7, 2025 21:46 IST2025-02-07T21:44:13+5:302025-02-07T21:46:06+5:30
धनंजय मुंडेवरील कारवाईबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मुंडेंवरील कारवाईबाबत चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; अजित पवार यांची भूमिका
नितीन चौधरी
पुणे : अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत अंजली दमानिया यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. मला जी माहिती दिली तीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिली आहे. याबाबत माझी फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हीच याबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती मी त्यांनी केली आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यापूर्वी मुंडे यांच्यावरील कारवाईबाबत अजित पवारच निर्णय घेतील असे सांगून फडणवीस यांनी कारवाईचा चेंडू पवार यांच्या कोर्टात टाकला होता. पवार यांनी आता हाच चेंडू फडणवीस यांच्या कोर्टात टोलविला आहे. त्यामुळे मुंडेवरील कारवाईबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पुणे विभागातील जिल्ह्यांच्या वार्षिक नियोजन आराखड्याच्या वाढीव खर्चाला मान्यता देण्यासाठी आयोजित बैठकीतनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराडशी असलेले संबंध यावरून धनंजय मुंडे हे अडचणीत आले असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे कृषीमंत्री असताना एका योजनेत नियम डावलून खरेदी केल्याचे पुरावे दिले आहेत. याबाबत आता काय निर्णय घेणार असे विचारले असता पवार यांनी यात पुरावे तर पाहिजेत, असे सांगून या आरोपांत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. तथ्य असल्यास चौकशी जरूर केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच पुरावे असल्यास चौकशी करू असे सांगत आहेत. त्यामुळे पुरावे आल्यानंतर त्यात कुणाचीही चौकशी होऊ शकते असे ते म्हणाले.
दमानिया यांनी आपली भेट घेऊन पुरावे दिल्याचे सांगितले होते. यावर पवार यांनी दमानिया यांच्या आरोपांची शहनिशा करण्याची गरज आहे. मुंडे आणि दमानिया यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वस्तुस्थिती काय आहे, याची माहिती घेतल्याशिवाय बोलणे उचित नसल्याचे ते म्हणाले. या भेटीत दमानिया यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत, असे सांगून मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली असता, त्यांनीही मला जी माहिती दमानिया यांनी दिली तीच माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे स्पष्ट केले. हे खुद्द फडणवीस यांनीच सांगतिले आहे. त्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी यात निर्णय घ्यावा अशी विनंती केल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार आलेली आहे. पोलिस चौकशी करतील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत महाराष्ट्र काहीही खपवून घेणार नाही. तारतम्य ठेवून वक्तव्य केली पाहिजेत. पोलिसांनी सर्व बाबी तपासून योग्य ती कारवाई करावी, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांबाबत हा रडीचा डाव असल्याचे सांगून जनतेने आम्हाला कौल दिला असल्याचे ते या वेळी म्हणाले.
लाडकी बहीण योजना जाहीर करताना अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मर्यादा ठेवलेली आहे. मात्र, योजनेचे नियम बारकाईने तपासायला वेळ मिळाला नाही. पूर्वी दिलेल्या कोणाचेही पैसे परत घेतले जाणार नाहीत. परंतु जे निकषांत बसत नाहीत त्यांचा लाभ बंद करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केेले.