अन्यथा माझी श्रद्धांजली सभा घ्यावी लागली असती; अजित पवारांनी सांगितला 'तो' जीवघेणा प्रसंग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 21:27 IST2023-01-15T21:26:53+5:302023-01-15T21:27:46+5:30
'मी ही गोष्ट कोणालाच बोललो नाही. अगदी मीडियाला सुद्धा बोललो नाही. नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली.'

अन्यथा माझी श्रद्धांजली सभा घ्यावी लागली असती; अजित पवारांनी सांगितला 'तो' जीवघेणा प्रसंग...
बारामती- बारामती तालुक्यातील पवईमाळ येथे आयोजित कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अनुभवलेला जीवघेणा अनुभव कथन केला. तो प्रसंग बारामतीकरांनी अक्षरशः श्वास रोखुन ऐकला.
शनिवारी पुण्यात घडलेल्या प्रसंगावर त्यांनी यावेळी मिश्किलपणे माहिती दिली. पवार म्हणाले, तिसऱ्या मजल्यावरुन चौथ्या मजल्यावर जायला निघालो, पण मध्येच वीज गेली. अन् चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या काही संकेद आधीच आमची लिफ्ट धाडकन खाली आदळली. परमेश्वराचे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणून मी अपघातातून वाचलो. अन्यथा आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती, असा जीवघेणा अनुभव विरोधी पक्षनेते पवार यांनी सांगितला.
पवार हे काल पुणे दौऱ्यावर होते. पुणे येथील हर्डीकर हॉस्पिटलमध्ये उद्घाटनासाठी लिफ्टने जात असताना चौथ्या मजल्यावर जाताना लिफ्ट बंद पडली. काही क्षणात लिफ्ट चालू होऊन काही कळायच्या आत थेट जमिनीवर आदळली. लिफ्टचा दरवाजा तोडून आम्ही बाहेर निघालो. नाहीतर आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला असता. मी ही गोष्ट कोणालाच बोललो नाही. अगदी मीडियाला सुद्धा बोललो नाही. नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली.
मात्र आज तुम्ही घरची माणसे असल्याने मला राहवलं नसल्याचे सांगत पुण्यातील प्रसंग सांगितला."काल वडिलांचा स्मृतिदिनाचा कार्यक्रम असल्याने त्यांचा श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीला आलो. मात्र घडलेला प्रसंग मी सुनेत्राच्या कानावरही घातला नाही, कुटुंबियांनाही सांगितला नाही. प्रसंग बाका होता पण त्यातून आम्ही वाचलो", असे पवार म्हणाले.