मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी अजय चंदनवाले यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 14:35 IST2018-06-06T14:35:46+5:302018-06-06T14:35:46+5:30
मागील सात वर्षांच्या कारकीर्दीत डॉ. अजय चंदनवाले यांनी ससून रुग्णालयाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला.

मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी अजय चंदनवाले यांची बदली
पुणे : ससून रुग्णालय व बी. जे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची यांची मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय व ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातापदी बदली करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा बदलीचा आदेश काढण्यात आला. ससूनमध्ये ते दि. १३ मे २०११ पासून अधिष्ठाता पदावर कार्यरत होते.
डॉ. चंदनवाले यांनी मागील सात वर्षांच्या कारकीर्दीत ससून रुग्णालयाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. निधीच्या कमतरतेमुळे रुग्णांना चांगल्या सुविधा देणे शक्य होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कामांसाठी अध्यापक, डॉक्टर्स व सहकाऱ्यांच्या टीम्स तयार केल्या. सामाजिक दायित्व (सीएसआर), खासगी व लोकसहभाग (पीपीपी) या माध्यमातून निधी उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आतापर्यंत त्यांनी ‘सीएसआर’च्या माध्यमातून तब्बल ८५ कोटीहून अधिक निधी उभा करून रुग्णालयाला अत्याधुनिक स्वरूप दिले. त्यांनी रुग्णालयामध्ये मुत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध केली. लवकरच हृदय प्रत्यारोपणासाठीही मान्यता मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. महाराष्ट्रात अद्याप एकाही शासकीय रुग्णालयामध्ये प्रत्यारोपणाची सुविधा नाही. अवयदानामध्ये ससुन रुग्णालय आघाडीवर आहे. मात्र, त्यांच्या कारकीर्दीत ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम रखडले. या इमारतीचे २००९ पासून काम सुरू असून अद्याप पुर्ण झालेले नाही.