लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाची दुसरी लाट शहरात येण्याची दाट शक्यता वाढत्या रुग्णसंख्येवरून दिसते आहे. या लाटेला प्रतिरोध करणारा कृती आराखडा महापालिकेने आधीच तयार करावा अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली आहे.
चव्हाण यांनी या संदर्भातले निवेदन शनिवारी (दि. २१) आयुक्तांना दिले. या नियोजनात मिळेल ती जबाबदारी स्विकारण्यास ‘राष्ट्रवादी’ तयार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
चव्हाण म्हणाल्या की, दिल्लीत या लाटेची सुरूवात झाली. मुंबई व ठाण्यातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनाने घेतला. पुण्यात १३ ते १७ नोव्हेंबर दरम्यान रोज सरासरी १४० रुग्णांची नोंद झाली. मात्र आता १८, १९ व २० नोव्हेंबरला अनुक्रमे ३८४, ४११ आणि ३७३ या संख्येत रूग्ण आढळून आले.
खासदार चव्हाण म्हणाल्या की, कोरोनाच्या सुरूवातीला साध्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देतानाही प्रशासन दमले होते. त्यामुळे आता आधीपासूनच प्रशासनाने तयारीत रहावे. डॉक्टर, परिचारिका,अन्य संबंधित कर्मचारी यांची उपलब्धता, औषधांचा पुरेसा साठा याचे नियोजन करावे. गेल्या वेळी प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींना या संपूर्ण मोहिमेपासून दूर ठेवले. त्याचा तोटाच झाल्याची टीका चव्हाण यांनी केली. यावेळी प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे असे आयुक्तांना कळवल्याचे त्यांनी सांगितले.