अल्पसंख्याक, ओबीसी, आदिवासी, वंचित समाजासाठी खंबीर; एमआयएम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 20:08 IST2025-09-10T20:08:02+5:302025-09-10T20:08:32+5:30

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ७५ वर्षे मते घेण्यात आली, मात्र मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले

AIMIM is strong for minorities, OBCs, tribals, and deprived communities; will contest local body elections | अल्पसंख्याक, ओबीसी, आदिवासी, वंचित समाजासाठी खंबीर; एमआयएम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार

अल्पसंख्याक, ओबीसी, आदिवासी, वंचित समाजासाठी खंबीर; एमआयएम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष सक्रीय होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने एमआयएमने पश्चिम महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणीस वेग दिला आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद येथे ५ सप्टेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीत ओवैसी यांनी महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना स्थानिक निवडणुकांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले असल्याची माहिती प्रदेश सहसचिव शफिउल्ला काझी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रदेश सहसचिव शफिउल्ला काझी यांची पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत संघटनात्मक काम सुरू झाले आहे. पुणे जिल्हा समन्वयक म्हणून फय्याज शेख, सांगली जिल्ह्यात शाहीद पिरजादे व टिपू इनामदार, कोल्हापूर जिल्ह्यात इम्रान सनदी व इलियास कुन्नुरे तर पुणे शहर समन्वयक म्हणून जुबेर पिरजादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर शफिउल्ला काझी म्हणाले, “महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत अल्पसंख्याक, ओबीसी, आदिवासी तसेच वंचित समाजासाठी एमआयएम खंबीर पर्याय ठरत आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ७५ वर्षे मते घेण्यात आली, मात्र मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. एमआयएम हा त्या पार्श्वभूमीवर प्रभावी पर्याय म्हणून उभा राहत आहे. आगामी १० ते १५ दिवसांत अहमदनगर, सांगली व कोल्हापूर येथे असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभांमधून पक्षाची निवडणूक रणनीती स्पष्ट होईल, असेही काझी यांनी सांगितले.

Web Title: AIMIM is strong for minorities, OBCs, tribals, and deprived communities; will contest local body elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.