Agriculture productivity will increase if knowledge, technology and credit is provided to farmers: Venkayya Naidu | शेतकऱ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान आणि पतपुरवठा केल्यास कृषि उत्पादकता वाढेल : वेंकय्या नायडू
शेतकऱ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान आणि पतपुरवठा केल्यास कृषि उत्पादकता वाढेल : वेंकय्या नायडू

ठळक मुद्देउत्पादन मिळत नसल्याने शेतीपासून अनेकजण जातायेत दूर

पुणे : शेतीमधून शाश्वत उत्पादन मिळत नसल्याने अनेक जण शेतीपासून तुटत आहेत. शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबरीने तरुणांना शेती व्यवसायाकडे वळविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे केले.  
वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचा पदवीदान कार्यक्रम उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल, केंद्रीय कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव वसुधा मिश्रा, वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचे संचालक के. के. त्रिपाठी या वेळी उपस्थित होते.
उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, अनियमित मान्सून, बाजार भावांची अनिश्चितता, नैसर्गिक आपत्ती यांचा कृषी क्षेत्रावर थेट परिणाम होत असून, यातून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्याची गरज आहे. कृषी क्षेत्राला शाश्वत आणि किफायतशीर बनविण्यासाठी कृषीमाल उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांची सुयोग्य सांगड घालण्याची आवश्यकता आहे. शेती व्यवहार्य, फायदेशीर आणि शाश्वत बनविण्यासाठी बहुस्तरीय धोरण विकसित करण्याची गरज आहे.
शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विमा क्षेत्रांना बळकट करून प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. कृषी उत्पादनाच्या विपणन व्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच शेतकऱ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान आणि पतपुरवठा केल्यास त्यांची उत्पादकता वाढेल. शेतकऱ्यांच्या ज्ञानात आणि त्यांच्याकडील तंत्रज्ञानात भर घालण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच कृषी क्षेत्रातील सर्वांना शेतकऱ्यांसोबत काम करावे लागेल, असे नायडू या वेळी म्हणाले. 
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेती मंजू नाथ, रौप्य पदक विजेता संतूर आरट, कास्य पदक विजेता सुकुमार एस., यांच्यासह विशेष प्राविण्य मिळविलेल्या समिक्षा दीक्षित, जॉबल रॉय या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 


Web Title: Agriculture productivity will increase if knowledge, technology and credit is provided to farmers: Venkayya Naidu
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.