मोबदला कमी दाखविण्यासाठी इंदापुरात अधिकाऱ्यांनी पिकाची नोंदच बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:09 IST2018-02-26T16:09:08+5:302018-02-26T16:09:08+5:30
कमी मोबदला देण्यासाठी चक्क एका शेतकरी महिलेच्या सातबारा उताऱ्यावरील डाळिंबाच्या पिकाची नोंदच कषि अधिकाऱ्यांकडून बदलण्यात आली आहे. डाळिंबाच्या ऐवजी उसाची नोंद केल्याने या महिलेला कमी मोबदला मिळाला.

मोबदला कमी दाखविण्यासाठी इंदापुरात अधिकाऱ्यांनी पिकाची नोंदच बदलली
लासुर्णे : शेतकऱ्यांना मोदबला देताना शासकीय अधिकारी नेहमी हात आखडता घेतात. याचा उत्तम नमुना इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथे समोर आला आहे. कमी मोबदला देण्यासाठी चक्क एका शेतकरी महिलेच्या सातबारा उताऱ्यावरील डाळिंबाच्या पिकाची नोंदच कृषि अधिकाऱ्यांकडून बदलण्यात आली आहे. डाळिंबाच्या ऐवजी उसाची नोंद केल्याने या महिलेला कमी मोबदला मिळाला. याचा जाब विचारताच महिलेवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी महावितरणचे अधिकारी देत आहेत.
पुष्पा बबन निंबाळकर यांची लासुर्णे येथील गट क्रमांक ७२३ येथील शेतामधून महापारेषणची भिगवण-वालचंदनगर २२० केव्हीची वीजवाहिणी गेली आहे. त्यांच्या शेतामध्ये महावितरणने मनोरे उभे केले आहेत. या गटामध्ये निंबाळकर यांनी ८० गुंठ्यांमध्ये डाळिंबाची फळबाग लावलेली आहे. याच शेतामधून वीज वाहिनी गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत जाब विचारताच गुन्हा दाखल करण्याची धमकी मिळत असल्याने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न निंबाळकर यांना पडला आहे.
शासनाच्या निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून मनोरे आणि वीज वाहिन्या गेल्या असतील, किंवा मनोरे उभे करायचे असतील त्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला देणे बंधनकारक आहे. शासनाचा नियम असतानाही महापारेषणचे अधिकारी व ठेकेदार निंबाळकरांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना मदत करण्याऐवजी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
निंबाळकर यांच्या शेतामध्ये साधारणपणे सात महिन्यांपूर्वी हा मनोरा उभा करण्यात आला होता. त्यावेळी मोबदला देण्यासंदर्भात कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला होता. या पंचनाम्यावेळी डाळींबाच्या पिकाचा मोबदला मिळावा अशी विनंती निंबाळकरांनी केली होती. त्यावेळी त्यांचा सातबारा उतारा घेऊन पंचनाम्यात डाळिंबाच्या पिकाची नोंद करण्यात आली होती. परंतु, डाळिंबाच्या पिकाचा मोबदला जास्त द्यावा लागेल म्हणून अधिकाऱ्यांनी डाळिंब पिकाची नोंद खोडून त्याठिकाणी उस पिकाची नोंद केली. ही नोंद झाल्यावर त्यांना ऊसाच्या पिकाचा मोबदला दिला गेला. तेव्हापासून त्या उर्वरीत मोबदल्यासाठी झगडत आहेत. ही खाडाखोड करणाऱ्या तसेच चुकीच्या नोंदी करणाऱ्या कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह महापारेषणचे अधिकारी, ठेकेदार यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी निंबाळकर यांनी मुख्यमंत्री व उजार्मंत्र्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निंबाळकर यांच्या शेतातील पिकाच्या मोबदल्याचा विषय मी याठिकाणी रुजू होण्यापुर्वीचा आहे. याविषयाची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. बाधित शेतक-याच्या पिकाचा पंचनामा कृषिविभागाने केला होता. प्रकरणाचा अभ्यास करुन मार्ग काढला जाईल. कोणत्याही बाधित शेतक-यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
- सोमनाथ अलीमोरे, उपकार्यकारी अभियंता