खासगी सहभागातून रस्ते ‘विकसित’ करण्यावर अखेर ‘एकमत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST2021-02-05T05:19:27+5:302021-02-05T05:19:27+5:30
पुणे : पालिकेच्या १२ रस्ते व दोन उड्डाणपुलांची निर्मिती खासगी सहभागामधून केली जाणार आहे. त्यासाठी ‘कॅश क्रेडिट बॉंड’ची सवलत ...

खासगी सहभागातून रस्ते ‘विकसित’ करण्यावर अखेर ‘एकमत’
पुणे : पालिकेच्या १२ रस्ते व दोन उड्डाणपुलांची निर्मिती खासगी सहभागामधून केली जाणार आहे. त्यासाठी ‘कॅश क्रेडिट बॉंड’ची सवलत दिली जाणार आहे. या उड्डाणपूल आणि रस्त्यांसाठी सल्लागार नेमण्याचे पाच स्वतंत्र प्रस्ताव स्थायी समोर ठेवण्यात आले होते. समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये या प्रस्तावांना ‘एकमताने’ मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
कल्याणीनगर ते मुंढवा दरम्यान नदीकाठाने ३० मीटर रुंद व ३.४ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यासाठी आराखडा तयार करणे, पर्यावरण विभागासह सर्वच शासकिय निमशासकीय विभागांचे ना हरकत दाखले मिळविणे आदी निविदापूर्व कामांसाठी मे. क्रिएशन इंजिनिअर्स प्रा. लि. यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पॅकेज २ अंतर्गत हडपसर येथील नाला नं. १ ते साडेसतरानळी येथील २४ मीटर रस्ता, अमनोरा पार्क ते केशवनगर ते माळवाडी रोड येथील प्रस्तावित अंडरपास १८ मी. डीपी रस्ता, अमनोरा पार्क ते मगरपट्टा रोड आणि माळवाडी ते अमनोरा मॉल रोडला समांतर १८ मी. डीपी रस्ता विकसनासाठी मे. इन्फ्राकिंग कन्सल्टिंग इंजिनिअर्स प्रा. लि. यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
पीपीपी अंतर्गत पॅकेज ४ मधील बहुचर्चित मुंढवा ते खराडी दरम्यानच्या मुळा मुठा नदीवरील पूल आणि जोड रस्त्याच्या कामासाठी मे. लायन इंजिनिअर्स प्रा. लि. यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
=चौकट=
‘सल्लागारां’ची रिंग?
पीपीपी तत्त्वावर नियोजित करण्यात आलेले मुंढवा-खराडी भागातील दोन उड्डाणपूल आणि १२ डीपी रस्त्यांच्या विकसनासाठी सल्लागार नेमण्यात येणार होते. त्यासाठी विविध कंपन्यांकडून कोटेशन्स मागविण्यात आले होते. या पाचही पॅकेजसाठी तीनच सल्लागार कंपन्यांनी कोटेशन्स दिली. तांत्रिकदृष्ट्या ही प्रक्रिया पार पडेल आणि प्रत्येकाला अपेक्षित काम मिळेल याची पुरेपूर खबरदारी घेऊन रिंग करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.