गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून प्रहार अपंग संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:13 IST2021-02-05T05:13:06+5:302021-02-05T05:13:06+5:30
सासवड: पुरंदरमधील अपंगांचे प्रश्न वारंवार निवेदन देऊनही मार्गी लागत नाही, पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी यांच्यासह समाज कल्याण विभागाचे ...

गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून प्रहार अपंग संघटनेचे आंदोलन
सासवड: पुरंदरमधील अपंगांचे प्रश्न वारंवार निवेदन देऊनही मार्गी लागत नाही, पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी वेळेत कामे करीत नाहीत, अपंगांचे घरकुल प्रस्ताव मंजूर होऊनही कामे सुरू होत नाहीत, प्रशासन एकेका कामाला वर्ष उलटले तरी कामे करीत नाहीत. त्या निषेधार्थ प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने पुरंदर पंचायत समितीमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकारी अमर माने आणि सहायक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांच्या खुर्च्या त्यांच्या दालनातून बाहेर काढून त्यांना हार घालून निषेध केला. त्यानंतर आमदार संजय जगताप यांच्या मध्यस्थीने आठ दिवसांत कामे मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रहार अपंग संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी प्रहार अपंग संघटनेचे सासवड शहराध्यक्ष दत्तात्रय दगडे, शासकीय समिती सदस्य शिवाजी शिंदे, अलका धुमाळ, रामदास शिंदे, जैतून सय्यद आणि इतर कार्यकर्त्यांना घेऊन पंचायत समितीचा ताबा घेतला. दिव्यांगांचे घरकुल प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत, मंजूर निधी त्यांच्या खात्यावर त्वरित वर्ग करावा, ज्यांची घरकुल मंजूर नाहीत याची माहिती घेऊन ती मार्गी लावावीत यासाठी गटविकास अधिकारी अमर माने, आणि गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांच्या खुर्च्या त्यांच्या दालनातून बाहेर काढण्यात आल्या. तसेच त्यांना हार घालून प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या.
सकाळी सुरु केलेले आंदोलन तब्बल दुपारी तीन वाजेपर्यंत सुरु होते. अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मागील आंदोलन आमदारांच्या आश्वासनानंतर मागे घेतले होते, त्यामुळे यावेळी त्यांनी येऊन लेखी आश्वासन द्यावे, असा पवित्रा श्रीमती ढवळे यांनी घेतला. त्यानंतर दुपारी अडीच वाजता आमदार संजय जगताप पंचायत समितीमध्ये आल्यानंतर सर्वांची चर्चा करून पुढील आठ दिवसांत अपंगांचे घरकुल प्रस्ताव मार्गी लागतील. तसेच त्यांच्या बाबत ज्या काही सूचना असतील त्यासाठी पंचायत समितीमध्ये सर्व पक्षांची एक बैठक घेवून त्यावर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर सभापती नलिनी लोळे यांनी पुढील कामाचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सभापती नलिनी लोळे यांच्यासह गटविकास अधिकारी अमर माने, सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते, माजी उपसभापती माणिकराव झेंडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, नीरा मार्केट समितीचे संचालक सुनील धिवार यांच्यासह हरिभाऊ लोळे, सहायक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, तसेच विविध विभागांचे विस्तार अधिकारी आणि अपंग संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार संजय जगताप यांनी सर्वसामोरच अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तुम्हाला कामे करता येत नसतील तर तसे सांगा. प्रत्येक वेळी तुमच्यामुळे अपंगांनी आंदोलने करायची आणि मी मिटवायला यायचे हे चालणार नाही. नाही तर एकेक अधिकारी एवढे वर्षे इथे काय करतात ते मला पाहावे लागेल. अपंगांचे प्रश्न त्वरित मार्गी लावा अन्यथा इथेच रिटायर्ड होण्याची तयारी ठेवा, असा सज्जड दमच भरला.
सासवड ( ता. पुरंदर ) येथील पंचायत समिती मध्ये प्रहार अपंग संघटनेच्या नेत्या सुरेखा ढवळे यांच्याशी चर्चा करताना संजय जगताप, सभापती नलिनी लोळे आणि इतर
Attachments area