दिल्लीतील आंदोलन शेतीच्या कंपनीकरणाच्या विरोधात : मेधा पाटकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 10:13 PM2021-01-30T22:13:48+5:302021-01-30T22:14:09+5:30

शिक्षण, आरोग्य यानंतर आता शेतीचेही कंपनीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न

The agitation in Delhi against the corporateization of agriculture: Medha Patkar | दिल्लीतील आंदोलन शेतीच्या कंपनीकरणाच्या विरोधात : मेधा पाटकर

दिल्लीतील आंदोलन शेतीच्या कंपनीकरणाच्या विरोधात : मेधा पाटकर

Next
ठळक मुद्देआंदोलन गांधीजींच्याच मार्गाने

पुणे: शिक्षण, आरोग्य यानंतर आता शेतीचेही कंपनीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन शेतीच्या या कंपनीकरणाच्या विरोधात आहे, असे प्रतिपादन नर्मदा आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी केले. हे आंदोलन महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गानेच चालले आहे असे पाटकर यांंनी ठामपणे सांगितले.

लोकशाही उत्सव समितीच्या वतीने एस. एम. जोशी सभागृहात पाटकर तसेच सीमा कुलकर्णी व नितीश यांचे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात व्याख्यान झाले. तिन्ही वक्त्यांनी केंद्र सरकारची या आंदोलनाकडे पाहण्याची दृष्टी योग्य नाही असे वेगवेगळी उदाहरणे देत सांगितले.

पाटकर म्हणाल्या, जन आंदोलनाचा समन्वय या संयुक्त मोर्चाच्या वतीने मी स्वतः आंदोलनात सहभागी होते. आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रकार सुरूवातीपासून होता. त्यांच्या घरात ट्रँक्टर आहे तर तो आंदोलनात दिसणारच! नातेवाईक परदेशात आहेत तर ते मदत करणारच!गावांगावांमधून अन्नधान्य येत होते तर गैर काय आहे? कायद्यानेच कमरेला असलेली तलवार, कृपाण आंदोलकांंनी ६० दिवसात कधीच काढली नाही व प्रजासत्ताक दिनीच कशी काढली? आंदोलनात घुसलेल्यांनीच हा प्रकार केला.  आंदोलन दडपशाहीने दाबून टाकण्याच्या प्रयत्नात सरकार लोकशाहीची चौकट मोडत आहे, सरकार आणि जनता यांच्यातील नातेच केंद्र सरकार संपवून टाकत आहे, अशी टीका पाटकर यांनी केली.

सीमा कुलकर्णी यांंनी आंदोलनातील महिलांचा सहभाग विषद केला. संसदीय नियमांची पायमल्ली करत तिन्ही कायदे मंजूर करण्यात आले असे नितीश यांनी स्पष्ट केले. समितीच्या अध्यक्ष सुनीती सु.र. यांंनी स्वागत केले. सचिव मिलींद कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. वक्त्यांचा सत्कार पारंपरिक पद्धतीने न करता नाचणीचे लाडू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले

... म्हणून आंदोलनात सहभागी व्हा

विमानतळ, रेल्वे यांचे कंपनीकरण झाले. यात सरकारची तिजोरी भरते आहे, पण वाढती विषमता बिभस्त होत चालली आहे. त्याविरोधात बोलायचे की नाही? म्हणून आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन पाटकर यांनी केले. 
 

Web Title: The agitation in Delhi against the corporateization of agriculture: Medha Patkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.