सिंहगड रस्ता भागात पुन्हा भडकले टोळीयुद्ध : गोळीबार करून माजवली दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 17:06 IST2020-02-03T17:03:16+5:302020-02-03T17:06:32+5:30
पूर्व वैमस्यातून तीन वाहनांची तोडफोड करीत दहा ते बारा तरुणांनी दहशत निर्माण करीत गोळीबार केल्याची घटना वडगाव बुद्रुक येथे घडली.

सिंहगड रस्ता भागात पुन्हा भडकले टोळीयुद्ध : गोळीबार करून माजवली दहशत
पुणे (धायरी): पूर्व वैमस्यातून तीन वाहनांची तोडफोड करीत दहा ते बारा तरुणांनी दहशत निर्माण करीत गोळीबार केल्याची घटना वडगाव बुद्रुक येथे घडली.
आज सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास दहा ते बारा तरुणांनी एका गॅरेज मध्ये बसलेल्या एका टोळक्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने येऊन त्या ठिकाणी असणाऱ्या तीन वाहनांच्या काचा फोडल्या. त्यानंतर तिथे बसलेल्या टोळक्याच्या दिशेने गोळीबार केला दरवाजाच्या बाजूला गोळी लागल्याने सुदैवाने ह्यात कोणीही जखमी झाले नाही.
ऑगस्ट महिन्यात ह्याच ठिकाणी वाहनांची तोडफोड
ऑगस्ट महिन्यामध्ये हातात लोखंडी कोयते, तलवारी नाचवत एका टोळक्याने दहशत माजवत सिंहगड रस्त्यावरील तुकाईनगर व समर्थनगर भागात रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षा, टेम्पो, स्कार्पिओ, कार, दुचाकीसह वीस ते पंचवीस गाड्यांची तोडफोड केली होती. शहरात बऱ्याच दिवसांपासून थांबलेल्या या प्रकारांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे.
वडगांव परिसरातील या भागात टेम्पो,कार, ट्रक,रिक्षा, मोटारसायकल आदी पंचवीस वाहनांची तोडफोड करीत येथील नागरिकांच्या घरात घुसून टीव्ही, फ्रिज, पंखे, इत्यादी साहित्यांची मोडतोड करून एका इसमास जबरी मारहाण करून जखमी केले होते. तसेच, तुकाईनगर येथील एका किराणा दुकानात घुसून दुकानाचीही मोठ्या प्रमाणात मोडतोड केली होती. सिंहगड रस्ता पोलिसांनी याबाबत त्वरित गुन्हा दाखल करून आरोपींना तत्काळ ताब्यातही घेतले होते. ही घटना ह्याच दोन टोळक्यांच्या वादातून घडली असल्याचे समोर आले होते.