पुणे - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून पुण्यात जर कोणी हेल्मेट न घालता दुचाकी चालवत असेल, तर त्यावर कारवाई करणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी सरकारी कार्यालये आणि काही महाविद्यालयांच्या बाहेर उभे राहून हेल्मेट घालून न येणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. एक तारखेला आता अवघे सात दिवस राहिले असताना पुणेकर या हेल्मेट सक्तीबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे. पुण्यातील हेल्मेट विक्रेत्यांशी संवाद साधला असता, हेल्मेट विक्रीत फरक पडला नसल्याचे त्यांनी सांगितले.शहरात घडलेल्या प्राणांतिक अपघातांची संख्या अधिक असल्याने; तसेच या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी अनेक दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे समोर आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांकडून एक जानेवारीपासून शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्यात येणार आहे. यावर, आता विविध राजकीय पक्षांकडून विरोध होत आहे. याआधी अनेकदा शहरात हेल्मेट सक्तीचा प्रयोग करण्यात आला होता; परंतु प्रत्येकवेळी नागरिकांनी याला कडाडून विरोध केल्याने सक्ती मागे घ्यावी लागली होती. आता पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे.रामदास भगत म्हणाले की, हेल्मेट सक्ती जाहीर केली असली, तरी नागरिकांमध्ये त्याचे फारसे गांभीर्य नाही. याआधी अनेकदा हेल्मेट सक्ती करण्यात आली होती; परंतु दरवेळेस ती मागे घेण्यात आली. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी लोक हेल्मेट वापरत नाहीत. ज्यांना हायवेने प्रवास करायचा आहे किंवा ज्यांना दररोज १५ ते २० किलोमीटरचे अंतर पार करावे लागते असे नागरिक हेल्मेट वापरतात. एक तारखेपासून जरी हेल्मेट सक्ती होणार असली, तरी दरवेळेस प्रमाणे यंदाही ती मागे घेण्यात येईल या आशेने नागरिकांचा हेल्मेट खरेदीला फारसा प्रतिसाद नाही.हेल्मेट खरेदीला उत्साह नाही१ ‘लोकमत’ने पुण्यातील विविध हेल्मेट दुकानांचा आढावा घेतला असता, नागरिकांकडून हेल्मेट खरेदीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. हेल्मेटसक्तीचा निर्णय झाला असला, तरी हेल्मेट खरेदीत फारशी वाढ झालेली नाही. काही नागरिक सुरक्षेसाठी हेल्मेट घेण्याकडे सध्या वळत असल्याचे चित्र आहे.२ हेल्मेटविक्रेते जगदीश शिंदे म्हणाले, ‘येत्या एक तारखेपासून शहरात हेल्मेट सक्तीची घोषणा करण्यात आली असली, तरी नागरिक हेल्मेट सक्ती फारशी गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. हा निर्णय जाहीर केला असला, तरी नागरिकांकडून हेल्मेट खरेदीत फारसा फरक पडला नाही.३ जे एक-दोन टक्के प्रमाण वाढले असेल ते डोक्याचे संरक्षण म्हणून आणि प्रदूषणापासून बचाव व्हावा यासाठी नागरिक हेल्मेट खरेदी करीत आहेत. त्यातही महिलांचा हेल्मेट खरेदी करण्याकडे कल जास्त आहे. साधारण आठशे ते चार ते पाच हजारांपर्यंत हेल्मेट विक्रीस उपलब्ध आहेत.
सात दिवसांनंतर हेल्मेटसक्ती होणार, तरी पुणेकर होईनात गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 02:05 IST