पुणे : पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील चौथा अहवाल आज, बुधवारी (दि. १६) शासनाला सादर होणार आहे. या अहवालानंतर शासन कोणती भूमिका घेणार? दोषींवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या संदर्भात विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी मंगळवारी (दि. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. तेव्हा चौथा शेवटचा अहवाल मिळाल्यानंतर त्वरित निर्णय घेऊन पारदर्शकपणे दोषींवर योग्य कारवाई केली जाईल व पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले असल्याची माहिती भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी दिली.
संपूर्ण राज्यात तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. या प्रकरणात नियुक्त चौकशी समित्यांच्या दोन अहवालांमध्ये दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, तिसऱ्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल गोपनीय ठेवण्यात आल्याने त्यातील निष्कर्ष फारसे समोर आलेले नाहीत. बुधवारी (दि. १६) ससून रुग्णालयाच्या समितीचा चौथा अहवाल शासनाला सादर होणार आहे. या अहवालातून नेमकं काय पुढे येणार याची प्रतीक्षा आहे. या अहवालात वैद्यकीय निष्काळजीपणा आढळला तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होण्याची चिन्ह आहेत. याबाबत विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी मंगळवारी (दि. १५) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी मुंबई येथे भेट घेतली. यावेळी बुधवारी (दि. १६) शेवटचा चौथा अहवाल सायंकाळपर्यंत प्राप्त झाल्यावर त्वरित निर्णय घेऊन दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. तसेच पीडित कुटुंबांना योग्य न्याय दिला जाईल. यामध्ये पारदर्शकता ठेवली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.- अमित गोरखे, आमदार, विधान परिषद