पुणे: पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. केंद्र सरकार या हल्ल्याला चोख उत्तर देईल, अशी अपेक्षा आहे. काही घडामोडी पाहता आताचा काळ हा सर्वच पक्षांसह विरोधी पक्षांनीही सरकारसोबत ठामपणे उभे राहण्याचा आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वक्तव्यावरून अकारण राजकारण करण्यात आले आहे. त्यामुळे कदाचित अतिरेक्यांना जे अभिप्रेत होते त्या पद्धतीने वातावरण दूषित होऊ नये, यासाठी समाज आणि देश म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांचा हेतू फूट पाडण्याचा असेल तर तो आपण यशस्वी होऊ देता कामा नये. आज पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष सरकारसोबत आहेत, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. दहशतवाद्यांना अद्दल घडायलाच हवी, असेही ते म्हणाले.
एका पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर डॉ. कोल्हे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत, मात्र एकही काम झाले नसल्याचे म्हटले जात आहे, त्याविषयी विचारले असता डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांमध्ये किती कामे मार्गी लावली याचा लेखाजोखा मांडला पाहिजे, असे स्पष्ट केले. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील का? तर हा निर्णय दोघांनी मिळून घ्यायचा आहे, त्यावर पवार कुटुंब एकत्र येतील का? यावर मात्र शरदचंद्र पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असे सांगून डॉ. कोल्हे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली.