आमच्यावर चाळीस वार केलेत पण राज्यातल्या जनतेवर वार करू नका- आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 18:28 IST2022-09-24T18:21:21+5:302022-09-24T18:28:34+5:30
राज्यातील सध्याचे सरकार नसून ती एक सर्कस आहे...

आमच्यावर चाळीस वार केलेत पण राज्यातल्या जनतेवर वार करू नका- आदित्य ठाकरे
पुणे : रोजगारासाठी तरुणांना लाठी खावी लागते हे दुर्दैव आहे. राज्यातील सध्याचे सरकार नसून ती एक सर्कस आहे. सध्या राज्यातील तरुणांचा रोजगार जातोय. मविआ सरकार असते तर वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta-Foxconn project) महाराष्ट्रात आणलाच असता, असं वक्तव्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी तळेगावात केलं. चाळीस आमदारांसोबत मीही राजीनामा देतो, सर्वांनी निवडणुकीला सामोरे जाऊ, असं आव्हानही शिंदे गटातील आमदरांना आदित्य ठाकरेंनी दिले.
आज पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे शिवसेनेने आंदोलन केले. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. यावेळी हजारो शिवसैनिक एकत्र येत त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही, केंद्राला किंवा गुजरातला दोष देत नाही, हा दोष खोके सरकारचा आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा गुजरातने घेतला. सध्या राज्याचे खरे मुख्यमंत्री कोण हेच कळत ऩाही.
माझ्या गटात कोण येतंय त्यापेक्षा महाराष्ट्रात रोजगार कोण आणतंय ते पाहा. आमच्यावर चाळीस वार केलेत पण राज्यातल्या जनतेवर वार करू नका. शिंदे सरकार हे सरकार नसून ती एक सर्कस आहे, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी बोलताना लगावला.