पुणे : येत्या दोन दिवसांनी श्रावण सुरू होत आहे. श्रावणात श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी पुणे जिल्ह्यासह विविध राज्यातून भाविक पुणे जिल्ह्यात येतात. या भाविकांच्या सुविधेसाठी पुणे एसटी विभागाकडून शिवाजीनगर, नारायणगाव आणि राजगुरूनगरसह १२ आगारातून जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले.
येत्या २५ जुलै पासून श्रावण सुरू होत असून, श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मोठी यात्रा भरते. पहिला श्रावणी सोमवार २८ जुलै रोजी असून, शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने दोन दिवस अधीपासूनच भाविकांची भीमाशंकर मंदिर परिसरात मोठी गर्दी होते. तर उत्तर भारतीयांचा श्रावणी सोमवार दि. १४ जुलै पासून सुरू झाल्यामुळे भीमाशंकरला भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, हे भाविक महाराष्ट्रासह विविध राज्यातून पुण्यात येतात. त्या भाविकांना भीमाशंकरला जाण्यासाठी शिवाजीनगर आगारातून १० तर पुणे विभागातील शिरूर आणि एमआयडीसी आगार वगळता अन्य सर्व आगारातून एकूण ४६ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
दि. २८ जुलै, दि. ४, ११ आणि १८ आॅगस्ट रोजी श्रावणी सोमवार आहे. तर त्याअधीच शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस त्यामुळे आठवड्यातील पाच दिवस (शुक्रवार ते मंगळवार) जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच बारामती येथील सोमेश्वर यात्रेसाठीही बारामती येथून ६ आणि एमआयडीसी येथून ४ असे एकूण १० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.