" त्यावेळी मी लाच हा शब्द वापरला..."; शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 23:35 IST2025-02-04T23:05:54+5:302025-02-04T23:35:37+5:30

छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून आता अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली आहे.

Actor Rahul Solapurkar has publicly apologized for his controversial statement on Chhatrapati Shivaji Maharaj | " त्यावेळी मी लाच हा शब्द वापरला..."; शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी

" त्यावेळी मी लाच हा शब्द वापरला..."; शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी

Rahul Solapurkar : छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी अखेर अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग सांगताना अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या दाव्यावरुन वादंग उठलेला आहे. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटले, असं विधान राहुल सोलापूरकर यांनी केले होते. या वक्तव्यावरुन टीका झाल्यानंतर राहुल  सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा नखभर सुद्धा अपमान करण्याचा माझा हेतू नाही, असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलं आहे.

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. राजकारण्यांसह शिवप्रेमींनी सोलापूरकर यांनी केलेल्या विधानावरुन राज्यभरात रोष व्यक्त केला. पुण्यात भांडारकर प्राच्य विद्या संस्थेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी एकत्र येत निषेध नोंदवला आणि सोलापूरकर यांच्या हकालपट्टीची मागणी केली. तसेच आंदोलकांनी सोलापूरकांच्या पुण्यातील घराबाहेरही निदर्शने केली. सोलापूरकर यांनी माफी मागायला हवी अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यानंतर आता राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे. व्हिडीओच्या माध्यमातून सोलापूर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

"दीड दोन महिन्यापूर्वी एका पॉडकास्टमध्ये मी ५० मिनिटे मुलाखत दिली होती. त्यादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी इतिहास आणि इतिहासातल्या रंजक गोष्टी कशा बदलतात याविषयी बोलताना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटका या विषयावर काही गोष्टी बोलतो. बिकानेरच्या राजवाड्यातील काही पुरावे. राजस्थानची काही कागदपत्रे, फारसी, उर्दू अशा ग्रंथांमध्ये आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांच्या काही गोष्टी ज्या वाचायला. अभ्यासायला मिळाल्या होत्या त्यामधल्या काही गोष्टी सांगून मी बोललो.  हे बोलताना महाराजांनी कोणाला रत्न दिली, पैसे दिले, काय काय केलं याचे फक्त एकत्रीकरण करताना महाराजांनी औरंगजेबाच्या जवळच्या इतर लोकांना कशा पद्धतीने आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि तिथनं स्वतःची सुटका करून घेतली हे सांगितले. हा विषय मांडताना मी लाच हा शब्द वापरला," असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलं.

"छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले याविषयी मी वेगळं सांगायची गरज नाही. किंबहुना छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली होती. जगभर गेली अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीची अनेक व्याख्याने उत्तमरीत्या देण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही. त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही. कोणीतरी फक्त त्या पॉडकास्ट मधील दोन वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असं मी म्हटलं असं दाखवण्यात आलं. त्यावरून संपूर्ण गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा नखभर सुद्धा अपमान करण्याचा माझा हेतू नाही," असंही सोलापूरकर म्हणाले.

Web Title: Actor Rahul Solapurkar has publicly apologized for his controversial statement on Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.