शिवाजीनगर, हिंजवडीत वेश्याव्यवसाय प्रकरणी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 13:34 IST2020-03-07T13:34:36+5:302020-03-07T13:34:54+5:30
या कारवाईत तीन परदेशी महिलांसह सहा जणींना घेण्यात आले ताब्यात

शिवाजीनगर, हिंजवडीत वेश्याव्यवसाय प्रकरणी कारवाई
पुणे : शहरातील वेगवेगळ्या उच्चभू्र भागांत ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायाचे (एस्कॉर्टिंग) प्रमाण वाढले आहे. दलालाकडून शिवाजीनगर भागात पाठविण्यात आलेल्या एका परदेशी महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने हिंजवडीतील एका हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत तीन परदेशी महिलांसह सहा जणींना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात एका दलालाचे नाव पुढे आले आहे. मॉन्टी ऊर्फ जगन्नाथ आर्यल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे. गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक डेक्कन भागात गस्त घालत होते, त्या वेळी शिवाजीनगर भागातील एका हॉटेलजवळ परदेशी महिला थांबली असून तिला वेश्याव्यवसायासाठी मॉन्टी नावाच्या दलालाने पाठविले असल्याची माहिती पोलीस शिपाई पुष्पेंद्र चव्हाण आणि संतोष भांडवलकर यांना मिळाली. पोलिसांनी तेथून परदेशी महिलेला ताब्यात घेतले.
तेव्हा चौकशीत मॉन्टीने हिंजवडी भागातील एका हॉटेलमध्ये महिलांना ठेवल्याची माहिती मिळाली. या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांपैकी तीन महिला परदेशातील असून मूळच्या कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानमधील आहेत. सुटका करण्यात आलेल्या अन्य ३ महिलांपैकी एक नेपाळची व दोघी भारतातील आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, उपनिरीक्षक खडके, पुकाळे, शिंदे, माने, करपे, खाडे, चव्हाण, कोळगे यांनी ही कारवाई केली.