नाणेकरवाडीतील कंपनीत पूर्व वैमनस्यातून कामगारावर अॅसिड हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 20:29 IST2018-05-22T20:29:33+5:302018-05-22T20:29:33+5:30
भांडणाचा राग मनात धरून दोन कामगारांनी सहकारी कामगारावर अॅसिड ओतून त्याला जखमी केले.

नाणेकरवाडीतील कंपनीत पूर्व वैमनस्यातून कामगारावर अॅसिड हल्ला
चाकण : नाणेकरवाडी ( ता.खेड ) गावच्या परिसरात सुपर एॅटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत दोन कामगारांनी भांडणाचा राग मनात धरून सहकारी कामगारावर अॅसिड ओतून त्याला जखमी केले. याप्रकरणी दोन कामगारांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ही घटना मंगळवारी ( दि. २२ ) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुपर एॅटो कंपनीत घडली. या घटनेत अजय श्रीहरिशंकर मिश्रा (वय २६, रा. अनुसया बिल्डिंग, जंबुकरवस्ती, नाणेकरवाडी, चाकण ) या जखमी झालेल्या कामगाराने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कंपनीत हेल्पर म्हणून काम करणाऱ्या रवी भगत व बबन भगत (दोघेही रा. नाणेकरवाडी, चाकण ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे सुपर एॅटो कंपनीत रात्रपाळीत काम करणारा कामगार अजय मिश्रा हा कंपनीच्या केबिनमध्ये काचा उघड्या ठेवून विश्रांती घेत असताना सात-आठ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यासोबत काम करणाऱ्या हेल्पर रवी व बबन यांनी कंपनीतील पेंट धुण्यासाठी लागणाऱ्या अॅसिडची बाटली अजयच्या अंगावर ओतून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी अजय याच्यावर चाकण येथील खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी कंपनीत वापरत असलेले अॅसिडचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. सदरचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
===============================================