अतिक्रमणधारकांना पोलिसांनी पाठीशी घातल्याचा आरोप
By Admin | Updated: February 16, 2016 01:31 IST2016-02-16T01:31:44+5:302016-02-16T01:31:44+5:30
अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे रविवारी (दि. १४) गायरान जमिनीवरील अतिक्रमणाला झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अतिक्रणधारकांना पाठीशी घातल्याचा आरोप अंथुर्णे ग्रामपंचायतीने केला आहे.

अतिक्रमणधारकांना पोलिसांनी पाठीशी घातल्याचा आरोप
अंथुर्णे : अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे रविवारी (दि. १४) गायरान जमिनीवरील अतिक्रमणाला झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अतिक्रणधारकांना पाठीशी घातल्याचा आरोप अंथुर्णे ग्रामपंचायतीने केला आहे. तसेच, कारवाईवेळी अतिक्रमणधारकांना पाठीशी घालणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या निलंबनाचीही मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.
अंथुर्णे ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणाचा प्रश्न आहे. गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे धनदांडग्यांसोबतच सर्वसामान्य ग्रामस्थांनीही अतिक्रमण केलेले आहे. सदरचे अतिक्रमण बाजारतळ, पालखीतळ, गावातील धार्मिक स्थळे, शाळा सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेमुसार सहा महिन्यांच्या आतील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय रविवारी (दि. १४) ग्रामपंचायतीने घेतला. वैयक्तिक द्वेष न ठेवता आम्ही ही कारवाई सुरू केली होती. परंतु या वेळी ग्रामस्थ व काही व्यक्तींनी गोंधळ घातला. परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करून ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तहसीलदार यांना आपले लक्ष्य केले. या सर्व गोंधळात पोलीस प्रशासनाने कायद्याला बगल देऊन अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही ग्रामपंचायतीने केला आहे. पोलिसांसहित सर्वांनीच ग्रामपंचायत प्रशासनाच्याच विरोधात एकतर्फी काम केल्याने हे अतिक्रमण काढणे ग्रामपंचायत प्रशासनास अशक्य झाले. परिणामी कारवाई थांबविणे भाग पडले. परंतु यापुढे ग्रामपंचायत अतिक्रमणाबाबत कायदेशीर मार्गाने अख्ांड लढा देणार आहे.
भविष्यात अंथुर्णे व परिसरात एकही अवैध बांधकाम व अतिक्रमण होऊ देणार नाही, असेही ग्रामपंचायतीने म्हटले आहे. या परिपत्रकावर सरपंच व ग्रामसेवक यांच्या सह्या आहेत.
(वार्ताहर)