पुणे: खराडी भागात भरधाव वेगातील पीएमपी बसच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच हडपसर भागात भरधाव कारच्या धडकेत आणखी एका पादचारी ज्येष्ठ नागरिकाला प्राण गमवावा लागला. पुणे-सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन केंद्र परिसरात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनीकारचालकाला अटक केली.
बाळासाहेब रामभाऊ चव्हाण (वय ६३, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक दानिश हसन शेख (वय ३२, रा. आदर्शनगर, उरुळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) याला अटक करण्यात आली. याबाबत आकाश चव्हाण (वय २६) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब चव्हाण हे मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरून निघाले होते. द्राक्ष संशोधन केंद्रासमोर भरधाव कारने पादचारी चव्हाण यांना धडक दिली. अपघातात चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक शेख याला अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अनिल बिनवडे तपास करत आहेत.