येरवड्यातील म्हाडा वसाहतीमध्ये घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून येथील ११० इमारतींपैकी ८० टक्के इमारती धोकादायक अवस्थेत आहेत.
येरवड्यातील म्हाडा वसाहतींमध्ये घडू शकते दुर्घटना
ठळक मुद्दे पालिकेने २०१८ साली केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये गंभीर घटना घडण्याचा इशाराम्हाडा वसाहतींच्या सुरक्षेचा प्रश्न बिकट वारंवार पाठपुरावा करुनही म्हाडाकडून कोणतीही उपाययोजना नाही
पुणे : शहरामध्ये सीमाभिंती कोसळल्याने २१ कामगारांचा बळी गेलेला असून धोकादायक वाड्यांची पडझडही सुरुच आहे. अशाच प्रकारच्या दुर्घटना येरवड्यातील म्हाडा वसाहतीमध्ये घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून येथील ११० इमारतींपैकी ८० टक्के इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. गेल्या वर्षी स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेऊन त्याचा अहवाल म्हाडाला कळविण्यात आल्यानंतरही त्यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी म्हाडाच्या जुन्या इमारती ऊन वारा पावसाला तोंड देत उभ्या आहेत. नुकतीच पालिकेकडून मनपा वसाहतींचीसुद्धा पाहणी करण्यात आली असून धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना स्थलांतरीत करण्याबाबत हालचाली करण्यात आल्या होत्या. येरवड्यामध्ये म्हाडाकडून १९८० साली अल्प उत्पन्न गटातील तसेच मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ११० इमारतींचे बांधकाम केले. या इमारतींमध्ये हजारो नागरिक सध्या राहात आहेत. यातील बहुतांश इमारती राहण्यालायक नसल्याचे चित्र आहे. पालिकेने २०१८ साली केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये गंभीर घटना घडण्याचा इशारा देतानाच या इमारती राहण्यालायक नसल्याचे म्हाडाला कळविले होते. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या इमारतींना भेट देऊन पाहणी केली होती. या पथकानेही त्यावेळी इमारती धोकादायक अवस्थेत असल्याचे मान्य केले होते. परंतू अद्याप या अहवालावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शासकीय उदासिनतेचे आणखी एक उदाहरण याठिकाणी पहायला मिळत असून दुर्घटना घडल्यानंतरच म्हाडा याकडे लक्ष देणार का असा सवाल उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केला आहे.=====महापालिकेने २०१८ साली केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये काही गोष्टी प्रामुख्याने नमूद केल्या आहेत. इमारतींच्या भिंती लोड बेअरींगमध्ये तयार करण्यात आलेल्या असून त्यासाठी वापरण्यात आलेले लोखंड कमकुवत झाले आहे. इमारतींच्या पायाचे दगड निसटू लागले असून भिंतींना भेगा पडू लागल्या आहेत. चुना आणि गुळाचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या भिंतींची क्षमताही कमी झाली असून त्यांना इमारतीचा भार पेलवेनासा झाला आहे. बहुतांश इमारतींच्या छताला गळती लागली असून चिनीमातीच्या ड्रेनेज लाईन्स आहेत. या ड्रेनेजला घुशी व उंदरांनी पोखरले आहे. ====म्हाडा वसाहतींच्या सुरक्षेचा प्रश्न बिकट बनला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्यावतीने या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्यात आले होते. त्यावेळी म्हाडाच्या पथकानेही याठिकाणी पाहणी केली होती. इमारती धोकादायक अवस्थेत असून कोणतीही दुर्घटना घडू शकते. वारंवार पाठपुरावा करुनही म्हाडाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. नागरिकांचा बळी गेल्यावरच अधिकारी जागे होणार आहेत असा प्रश्न आहे.- डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर====