राजगुरुनगर: खेड तालुक्यातील खरपूडी येथील चर्चित आंतरजातीय विवाह आणि अपहरण प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. प्राजक्ताचे वडील राजाराम काशीद यांनी प्राजक्ताचा पती विश्वनाथ गोसावी याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्राजक्ता आजारी होती आणि तिला गोसावीच्या आश्रमात उपचारासाठी नेलं गेलं होतं. पण, गोसावीने तिला फसवून आळंदीला नेलं आणि लग्न केलं, असे राजाराम काशीद यांचं म्हणणं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी प्राजक्ताचे आई व भाऊ यांना न्यायालयाने दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
खेड प्रेम प्रकरण: प्राजक्ताचे वडिलांचं म्हणणं काय?
राजाराम काशीद यांनी आपल्या कुटुंबावरील सर्व आरोप फेटाळून लावत गोसावी यांच्यावर फसवणुकीचा आणि कायद्याचा भंग केल्याचा आरोप केला आहे.
राजाराम काशीद यांनी सांगितले की, "विश्वनाथ गोसावी हा कोणताही महाराज नसून, खरपूडी येथील मठाच्या नावाखाली अनेक गैरप्रकार करत आहे. त्याचे अनेक चुकीचे व्यवसाय तालुक्याबाहेरही सुरू असून, पैशाच्या जोरावर ते काहीही करू शकतो", असा गंभीर आरोप काशीद यांनी केला आहे.
प्राजक्तावर गोसावीच्या आश्रमात उपचार
"प्राजक्ता गेल्या वर्षी आजारी होती. तिला अनेकदा दवाखान्यात नेण्यात आले, पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे तिला खरपुडी येथील गोसावी याच्या आश्रमात नेण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नंतर आम्हाला कळले की, गोसावी याने प्राजक्ताला फसवून आळंदी येथे तिच्याशी लग्न केले."
काशीद म्हणाले, गोसावीचे आधीच लग्न झाले आहे
काशीद यांनी असा दावा केला आहे की, "गोसावीचे आधी लग्न झालेले आहे आणि त्याची पहिली पत्नी अजूनही खरपुडी येथे वास्तव्यास आहे. त्यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. त्यामुळे दुसरे लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे. या मठाकडे स्थानिक प्रशासनाचे कोणतेही लक्ष नसल्याने गोसावी याचे काळे व्यवसाय फोफावत आहे", असा आरोपही त्यांनी केला आहे.