पुणे : ट्रक मागे घेताना चाकाखाली चिरडून तरुण कामगार ठार झाला आहे. हा अपघात १७ मार्च रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास लोणी काळभोरमधील रामाकृषी कंपनीत घडला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भैरवनाथ गोवर्धन काकडे (३१ रा. बोरीभडक, दौंड ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील काकडे (३६ रा. चंदनवाडी, दौंड ) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात रामाकृषी कंपनी असून, त्याठिकाणी भैरवनाथ काकडे कामाला होता. १७ मार्चला संध्याकाळी साडेचारच्या सुमारास कंपनीत ट्रकमधील साहित्य खाली करण्यात येत होते. त्यावेळी चालकाने ट्रक मागे घेतला असता, भैरवनाथ चाकाखाली सापडल्यामुळे गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, पसार ट्रक चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रूपाली जाधव करत आहेत.