बारामती वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 19:37 IST2025-08-31T19:37:51+5:302025-08-31T19:37:51+5:30
गतिरोधकाचा अंदाज आल्याने डीव्हायडरला दुचाकीची धडक

बारामती वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू
बारामती-बारामतीत रस्त्याच्या अपघातांत बळी जाणाऱ्या दुचाकीस्वारांंची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.शनिवारी(दि ३० )रात्री झालेल्या अपघातात आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा अपघाती मृत्यू झाला आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी आणि वाहनांचा वेग रोखण्यासाठी तयार केलेले गतीरोधक या विद्यार्थीनीच्या अपघाताला कारणीभूत ठरले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्यु झालेल्या विद्यार्थीनीचे शरयू संजय मोरे (वय २२ ) असे नाव आहे. रात्री दहाच्या सुमारास बारामती शहरातील भिगवन रस्त्यावर गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. शरयू ही वैद्यकीय पदवीच्या तिसऱ्या वर्षांमध्ये शिकत होती.
तिचे वडील सांगली जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करतात.शरयु हि हुशार विद्यार्थीनी होती.तसेच ती राष्ट्रीय खेळाडु देखील होती.एक वर्षाने ती वैद्यकीय शिक्षण पुर्ण करुन डॉक्टर म्हणून बाहेर पडणार होती. मात्र त्यापुर्वीच तिच्यावर काळाने घाला घातला.तिच्या अपघाती मृत्युने वैद्यकीय महाविद्यालयावर शोककळा पसरली आहे.
शरयू मोरे ही तिच्या एका मैत्रिणीसह दुचाकीवरून शनिवारी रात्री बारामतीतून एमआयडीसी परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहाकडे निघाली होती. भिगवन रस्त्यावरील ऊर्जा भवन नजीक तिची दुचाकी आली असता, ऊर्जा भवन नजीकचा गतिरोधकाचा अंदाज तिला आला नाही आणि तिची दुचाकी डिव्हायडरला धडकली. यात दुचाकी चालवणाऱ्या शरयूचा जागीच मृत्यू झाला तर तिची दुसरी मैत्रीण जखमी झाली आहे.तिच्यावर उपचार सुरु आहेत.
शनिवारी(दि ३०) सकाळी पावणेसातच्या सुमारास बारामती निरा मार्गावर शारदानगर येथे एसटी बस आणि दुचाकीचा अपघात झाला.या अपघातात दुचाकीवर आपल्या नातीला शाळेत सोडण्यासाठी आलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र दिनकर भागवत (वय ५९,रा.गोखळी,ता.फलटण,जि.सातारा)यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांची नात आणि प्रसिध्द खेळाडु स्वरा योगेश भागवत हि गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर बारामतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याशिवाय शनिवारी रात्री झालेल्या अपघातात वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थीनीचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे शनिवार हा घातवार ठरला.