Pune koyta gang latest news: पुण्यातील एक व्हिडीओ, जो बघून तुम्हालाही घाबरायला होईल. रात्रीची वेळ आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ आहे. लोक ये-जा करत असतानाचा रस्त्याच्या कडेला दोन गटात तुफान मारामारी झाली. थेट कोयता काढून सपासप वार करण्यात आले. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ही घटना घडली. हा व्हिडीओ पोस्ट करत अनेकांनी वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गेल्या काही वर्षात पुण्यात कोयत्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी सातत्याने होत असतानाही या घटना वाढतच चाललेल्या आहेत. बिबवेवाडीत परिसरात दोन गटात वाद होऊन कोयत्याने एकमेकांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोयत्याने हल्ला, व्हिडीओमध्ये काय?
बिबवेवाडी भागात ही घटना घडली आहे. व्हिडीओमध्ये काही एका चारचाकी समोर उभे असल्याचे दिसत आहे. त्यांच्या बिनसल्याचे दिसत असून, याचदरम्यान, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या हातातून कोयता घेतो आणि समोरच्या गटातील व्यक्तीवर वार करतो.
वाचा >>Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस
त्यानंतर तो कोयता घेऊन दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर जातो. कोयत्याचा वार चुकवण्यासाठी व्यक्ती पळतो आणि तोल जाऊन खाली पडतो. तरीही त्याच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या हातातून दुसरा व्यक्ती कोयता घेतो आणि वार करतो. याचवेळी एक व्यक्ती सपाट दगड घेऊन येतो आणि त्याच्या दिशेने फेकतो. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या दिशेने दगड फेकून मारतात आणि पळतात.
बिबवेवाडी कोयता हल्ला व्हिडीओ
या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी ट्विट केला आहे. भररस्त्यात झालेल्या या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. आमदार रोहित पवार यांनीही व्हिडीओ पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांना पुण्यातील परिस्थितीकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
"पुण्यातल्या कोयता गँगचा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता, सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते आणि हा बघा कोयता गँगचा कालचा थरार! पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, ही विनंती", असे रोहित पवारांनी म्हटले आहे.