पुण्यातील मटका व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून हत्या; इमारतीच्या टेरेसवर भरदिवसा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 23:09 IST2022-02-20T22:40:48+5:302022-02-20T23:09:58+5:30
शिरवळमधील घटना

पुण्यातील मटका व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून हत्या; इमारतीच्या टेरेसवर भरदिवसा प्रकार
शिरवळ : येथील एका इमारतीच्या टेरेसवर पुण्यातील मटका व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून अज्ञाताने हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली. हा खून नेमका कोणत्या कारणातून व कोणी केला, हे अद्याप समोर आले नसून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
संजय सुभाष पाटोळे (वय ३६, रा. बिबवेवाडी, पुणे) असे हत्या झालेल्या मटका व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील फुलमळा परिसरात लेक पॅलेस या नावाची अपार्टमेंट आहे. ही इमारत सहा मजली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास एक महिला इमारतीच्या टेरेसवर गेली असता तिला एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यानंतर तिने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला. पतीने या प्रकाराची माहिती शिरवळ पोलिसांना दिली. यानंतर मात्र शिरवळ पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना मृतदेहाजवळ आधार कार्ड सापडले. यावरून मृत व्यक्ती संजय पाटोळे असून, तो पुण्यातील मटका व्यावसायिक असल्याचे समोर आले.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, अनिल बारेला, पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, पोलीस अंमलदार संजय सपकाळ, अरुण भिसे-पाटणकर, प्रशांत वाघमारे, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ठसे तज़्ज्ञ आणि श्वानालाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोलिसांना गोळीची पुंगळी सापडली असून, इतर ठिकाणी काही संशयास्पद सापडतेय का, याचा पोलीस शोध घेत आहेत.
पाटोळे कोणाकडे आला याचा शोध सुरू..
लेक पॅलेस इमारतीमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे लोक राहत आहेत. यातील कोणत्या कुटुंबाकडे संजय पाटोळे हा आला होता. याची पोलीस कसून चाैकशी करत आहेत. त्यानंतरच या खुनाचे कारण समोर येणार आहे.