Pune: पंपावर रक्कम लुटीआधीच घेरली दरोडेखोरांची टोळी; चोरट्यांकडून कोयते जप्त

By नितीश गोवंडे | Updated: April 1, 2024 18:43 IST2024-04-01T18:43:09+5:302024-04-01T18:43:31+5:30

पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले...

A gang of robbers surrounded the pump before looting money; Coyote confiscated from thieves | Pune: पंपावर रक्कम लुटीआधीच घेरली दरोडेखोरांची टोळी; चोरट्यांकडून कोयते जप्त

Pune: पंपावर रक्कम लुटीआधीच घेरली दरोडेखोरांची टोळी; चोरट्यांकडून कोयते जप्त

पुणे : कात्रज परिसरात एका पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. चोरट्यांकडून कोयते जप्त करण्यात आले.

ओंकार उर्फ बाब्या संतोष पवार (२१, रा. मानाजीनगर, नऱ्हे), रोहित काशीनाथ धोंगडे उर्फ डी (२१, रा. महालिला निवास, कात्रज), रोहन विठ्ठल रणदिवे (१९, रा. त्रिमूर्ती हाईट्स, गुजरवाडी, कात्रज) आणि संकेत संजय हटकर (२०, रा. बालभवन, संतोषनगर, कात्रज) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस कर्मचारी विक्रम सावंत यांनी फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील तपास पथक कात्रज भागात गस्त घालत होते. त्यावेळी किनारा हाॅटेल परिसरातील एका पेट्रोल पंपावर चोरट्यांची टोळी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून पवार, धोंगडे, रणदिवे, हटकर यांना पकडले. त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. चोरट्यांकडून कोयते, मिरची पावडर, दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी-पराजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, सहायक निरीक्षक विश्वास भाबड यांच्यासह पथकाने केली.

Web Title: A gang of robbers surrounded the pump before looting money; Coyote confiscated from thieves