सार्वजनिक शौचालयात आढळले एक दिवसाचे अर्भक; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक प्रकार
By प्रकाश गायकर | Updated: April 19, 2024 16:52 IST2024-04-19T16:52:18+5:302024-04-19T16:52:37+5:30
अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

सार्वजनिक शौचालयात आढळले एक दिवसाचे अर्भक; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक प्रकार
पिंपरी : सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक आढळून आले. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. १७) सकाळी सव्वानऊ वाजता तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिस अंमलदार सुनील सगर यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे शहरात एका सार्वजनिक शौचालयात असलेल्या कचऱ्यात अर्भक असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले. त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा पूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पुरुष जातीचे अर्भक असून त्याचे वय एक दिवस एवढे आहे. अर्भकाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने त्याला अशा प्रकारे टाकून देण्यात आले आहे. पोलिसांनी अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.