कोयत्याने वार केल्याने मुलाचा जागीच मृत्यू, उंडवडी सुपे बसस्थनकावर घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 20:23 IST2024-04-18T20:23:37+5:302024-04-18T20:23:49+5:30
पुढील तपास सपोनी नागनाथ पाटील करीत आहेत.

कोयत्याने वार केल्याने मुलाचा जागीच मृत्यू, उंडवडी सुपे बसस्थनकावर घडली घटना
सुपे-बारामती एसटीबसने आलेला कॉलेजचा मुलगा उंडवडी सुपे बसस्थानकावर उतरताच चार तरुणांनी कोयता व कुऱ्हाडीने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उंडवडी सुपे येथे दुपारी साडेपाचच्या दरम्यान घडली. या घटनेने संपुर्ण परिसर हादरुन गेला आहे. विनोद प्रविण भोसले ( रा. कारखेल, ता. बारामती ) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर आरोपी यश मांढरे, सुमित भापकर, सुयश भापकर, वैभव भापकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद हा बारामती येथे कॉम्पुटर इंजिनिरींगचे शिक्षण घेत होता. एसटी बसने उंडवडीच्या बसस्थानकावर उतरलेल्या विनोद यास कारखेलमधीलच यश मांढरे, सुमित भापकर, सुयश भापकर, वैभव भापकर या चार जणांनी कोयता व कुऱ्हाडीने अनामुष वार करून गंभीर जखमी केले. यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार ( दि. १८ ) दुपारी साडेपाचच्या दरम्यान घडली. ही चारही मुलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
गावात शिवजयंतीच्या वेळी झालेल्या मुलांच्या वादातून तसेच काल दुचाकीवरुन जाताना कट मारल्याचा राग मनात ठेवुन ही घटना घडल्याचे सुपे पोलिस स्टेशनचे सपोनी नागनाथ पाटील यांनी सांगितले. या घटनेतील अधिक कारणांचा शोध सुपे पोलीस घेत आहेत. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान बारामतीचे उपविभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक पुढील तपास सपोनी नागनाथ पाटील करीत आहेत.