पुणे : मेट्रो प्रवासी महिलेशी अश्लिल वर्तन करणाऱ्या एकाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानक परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी मूळचा बिहारमधील मुझफ्फरनगरचा रहिवासी आहे. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मंगळवारी (९ सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास मेट्रोतून प्रवास करत होती. त्या वेळी आरोपीने महिलेकडे एकटक पाहून इशारे केले. त्याने महिलेची मोबाइल कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने मेट्रो स्थानकातील सुरक्षारक्षकांना सांगितले. प्रवाशाला ताब्यात घेऊन मंडई पोलीस चौकीत आणण्यात आले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ६५ वर्षीय प्रवाशाविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३५ (३) नोटीस बजाविण्यात आली आहे. अश्लिल वर्तन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.