दाेन गर्भवतींसह १५ वर्षीय मुलगाही झिका पाॅझिटिव्ह; पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या १५वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 23:58 IST2024-07-09T23:57:26+5:302024-07-09T23:58:08+5:30
खासगी प्रयाेगशाळेत नमुना पाॅझिटिव्ह आलेल्या महिलेचा अहवाल ग्राह्य न धरल्याने अधिकृत संख्या १५

दाेन गर्भवतींसह १५ वर्षीय मुलगाही झिका पाॅझिटिव्ह; पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या १५वर
लाेकमत न्यूज नेटवर्क, पुणे: शहरातील विविध भागांमध्ये दररोज झिकाचे नवीन रुग्ण आढळून येत असून मंगळवारी आणखी तीन रुग्णांची यामध्ये भर पडली. यापैकी पाषाण परिसरातील दाेन गर्भवती आणि भुसारी काॅलनी येथील १५ वर्षाचा मुलगा आहे. आतापर्यंतच्या झिका रुग्णांची संख्या १६ वर पाेचली आहे. मात्र, खासगी प्रयाेगशाळेत नमुना पाॅझिटिव्ह आलेल्या मुंढवा येथील महिलेचा अहवाल महापालिकेने ग्राहय न धरल्याने ही अधिकृत रुग्ण संख्या १५ झाली आहे.
नवीन रुग्णांमध्ये पाषाण परिसरातील एक 18 वर्षीय तरूणी असून ती 28 आठवड्यांची गर्भवती आहे. तिला सांधेदुखी आणि डोकेदुखी असा त्रास होत होता. दुसरी 19 वर्षीय तरूणी असून ती 23 आठवड्यांची गर्भवती आहे. तिला घसा खवखवण्याचा त्रास होत होता. दोन दिवसांपूर्वी पाषाणमधील एका गर्भवतीचा झिका अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच परिसरातील 38 गर्भवतींचे रक्तनमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी या दोन गर्भवतींचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान उजवी भुसारी काॅलनी, काेथरूड येथील एका १५ वर्षीय मुलाला केवळ लाल चटटयांची लक्षणे हाेती. त्याचा अहवाल खासगी प्रयाेगशाळेने एनआयव्ही कडे पाठवला हाेता. त्याचाही अहवाल पाॅझिटिव्ह आला असून ताे सर्वांत कमी वयाचा झिकाचा रुग्ण ठरला आहे.
दरम्यान, आतापर्यंतच्या झिका पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एरंडवणे भागातील 5, मुंढवा भागातील 2, डहाणूकर कॉलनीतील 2, पाषाणमधील 3, आंबेगाव बुद्रूक 1, खराडीमधील 1, कळसमधील 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. बहुतांश रुग्णांमध्ये ताप आणि लाल चट्टे, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी अशी लक्षणे आढळून आली आहेत, अशी माहीती महापालिकेच्या आराेग्य विभागाचे सहायक आराेग्य अधिकारी डाॅ. राजेश दिघे यांनी दिली.