84% rich candidates wons in Lok Sabha elections: Varun Gandhi's clarification | लोकसभा निवडणुकीत ८४ टक्के श्रीमंत उमेदवार विजयी : वरूण गांधी यांची स्पष्टोक्ती 
लोकसभा निवडणुकीत ८४ टक्के श्रीमंत उमेदवार विजयी : वरूण गांधी यांची स्पष्टोक्ती 

ठळक मुद्दे१०० टक्के गरीब उमेदवारांचे डिपॉझिट जप्त जनतेपर्यंत खऱ्या अर्थाने मदत पोहचवायची असेल तर शासनाला धोरणात्मक सुधारणा गरजेची शहरांमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध होत नाहीखेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास देशाचा विकास अशक्य

लोकमत न्यूज नेटवर्क 
पुणे : देशात २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ८४ टक्के श्रीमंत उमेदवार विजयी झाले. त्याचबरोबर ज्या उमेदवारांची आर्थिक परिस्थिती गरिबीची होती त्या १०० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले अशी स्पष्टोक्ती भाजपाचे नेते, खासदार वरूण गांधी यांनी शुक्रवारी केली. वरूण गांधी यांनी लिहलेल्या ‘अ रूरल मॅनिफेस्टो, रिलायझिंग इंडियास फ्युचर थ्रू हर व्हिलेज’ या पुस्तकाचे प्रकाशन सिंम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, डॉ.ज्योती चंद्रमणी उपस्थित होते. 
ग्रामीण आणि शहरी भागांतील दरी वाढत असल्याचे तथ्य वरूण गांधी यांनी आकडेवारीनिशी उलगडून दाखविले. गांधी म्हणाले, ‘देशातील आयएएस अधिकाऱ्यांचा अभ्यास केला असता त्यांच्या एकूण लोकसंख्येपैकी ८५ टक्के आयएएस अधिकारी हे देशातील प्रमुख २० शहरांमधून आल्याचे दिसून येते. त्याचबरोबर ७९ टक्के आयएएस अधिकाऱ्यांनी खाजगी शाळांमधून शिक्षण घेतले आहे. आयआयटी, आयआयएममध्ये देशातील मागास १०० जिल्हयांमधून किती विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आले याची माहिती घेतल्यास विदारक चित्र समोर येईल. शहरांमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ते मागे पडत आहेत. सगळयाच क्षेत्रात मोठयाप्रमाणात असमानतेचे चित्र दिसून येत आहे.’
देशातील मोठया संख्येने असलेल्या ग्रामीण भागातील जनतेपर्यंत खऱ्या अर्थाने मदत पोहचवायची असेल तर शासनाला धोरणात्मक सुधारणा कराव्या लागतील. विदर्भात जलसिंचनाच्या सुविधा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध झाल्या, त्याचे परिणाम शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागण्याइतपत भयावह दिसून आले. ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाची जास्तीत जास्त मदत घ्यावी लागेल असे गांधी यांनी सांगितले.
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, ‘खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास देशाचा विकास शक्य नाही. देशात ६ लाख खेडी आहेत, या खेडयांमध्ये शहराप्रमाणे सोयी सुविधा पुरविल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे शहरे स्मार्ट करण्यासाठी योजना राबविल्या जात आहेत, त्याप्रमाणे खेडी स्मार्ट करण्यासाठी शासनाने योजना राबवाव्यात.’
डॉ. रजनी गुप्ते यांनी प्रास्ताविक केले.
....
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व ठाणे ही तीन शहरे सर्वाधिक पाण्याचा वापर करतात. काही वर्षांपूर्वी लातूरला ट्रेनने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढावली होती. त्याचवेळी शहरांमध्ये स्विमिंग टँक बांधण्याचा सपाटा सुरू आहे. शहर आणि खेडयांमधील हा विरोधाभास दूर होण्याची गरज असल्याचे मत वरूण गांधी यांनी व्यक्त केले.
  

Web Title: 84% rich candidates wons in Lok Sabha elections: Varun Gandhi's clarification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.