पुणे : राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती ग्राह्य धरली जाते. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांची आधार कार्डानुसार माहिती अद्ययावत करण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे १४ लाख ग्राहकांची माहितीची पडताळणी करण्यात आली आहे. एकूण ग्राहकांच्या संख्येच्या तुलनेत ही टक्केवारी सुमारे ६४ टक्के इतकी आहे. ही माहिती अद्ययावत नसल्यास संबंधितांना अशा योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे सर्व ग्राहकांनी आधार जोडणीसह हातांचे ठसे दुकांनांमध्ये द्यावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांची अद्ययावत माहिती सध्या गोळा केली जात आहे. त्यासाठी ई केवायसी अर्थात ग्राहकाची माहिती शिधापत्रिकेला जोडली जात आहे. त्यात आधार क्रमांक व हाताच्या बोटांचे ठसे घेतले जात आहेत. ही प्रक्रिया आपण ज्या रेशन दुकानातून धान्य घेतो, त्याच ठिकाणी दुकानदारामार्फत केली जात आहे. यातून बनावट शिधापत्रिकाधारकांना आळा बसत आहे. जिल्ह्यात ६ लाख ३० हजार ८५४ शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिकांमध्ये एकूण २६ लाख ६० हजार २२३ सदस्य आहेत. जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकांच्या किमान एका सदस्याचे अर्थात १०० टक्के शिधापत्रिकांना आधार जोडणी करण्यात आली आहे.
मात्र, राज्य सरकारच्या निर्देशांनुसार सर्व शिधापत्रिकाधारकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे ईकेवायसी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ९३ हजार ५८२ सदस्यांचे ई केवायसी पूर्ण करण्यात आले आहे. एकूण संख्येच्या हे प्रमाण ६३.६६ टक्के इतके आहे. त्यात सर्वाधिक ७३ टक्के ईकेवायसी शिरूर तालुक्यात पूर्ण करण्यात आले आहे. तर सर्वात कमी ४५ टक्के प्रमाण मुळशी तालुक्यात झाले आहे.
ईकेवायसी करताना ग्राहकांनी दिलेल्या आधार कार्डनुसार त्याची ऑनलाइन पडताळणी केली जाते. ग्राहकाने पूर्वी दिलेल्या माहितीशी त्याची जुळणी करून त्यात ग्राहकाच्या नावासह लिंग व जन्मतारीख नोंदविली जाते. तसेच हाताच्या बोटांचे ठसेही नव्याने घेतले जातात. ई केवायसी केल्यानंतर शिधापत्रिका अद्ययावत होते.राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत अशा योजनांचा लाभ घेताना शिधापत्रिकेवरील माहिती मागितली जाते. शिधापत्रिकेवर असलेल्या माहिती जुळणी झाल्यानंतर या योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी ई केवायसी करावी, असे आवाहन सुधळकर यांनी केले आहे.
तालुका आधार पडताळणी सदस्य संख्या-- टक्के
हवेली ६८४७१--६८
बारामती २१५३९१--६१
आंबेगाव १२३९८०--५८
भोर ७५७६९--६४
दौंड १६७२३०--६९
इंदापूर १८५९२९--६१
जुन्नर २१७५३८--६८
खेड १८५३३१--६०
मावळ ९८८१८--५८
मुळशी ४०३६३--४५
पुरंदर ११९१४०--६९
शिरूर १७२३४८--७३
वेल्हा २३२७४--६४
एकूण १६९३५८२--६३.६६