पुणे: लोहगाव विमानतळावरून बुधवारी (दि.१०) दिल्ली, लखनऊ, बंगळुरू आणि चेन्नईला जाणाऱ्या पाच विमानांना उशीर झाला. यामध्ये दिल्लीला जाणाऱ्या (इंडिगो ६ इ ३३८) आणि (स्पाइस जेट ९१४) या दोन विमानांना दीड तासापेक्षा जास्त उशीर झाला. यामुळे विमानतळावर प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.
लोहगाव विमानतळावरील नवीन टर्मिनल झाल्यावर विमान प्रवासी वाढ होत आहे. परंतु विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या अनेक विमानांना कोणत्या ना कोणत्या कारणाने दररोज उशीर होत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. नियोजित वेळी प्रवासी एक तास अगोदर विमानतळावर येतात. परंतु विमानतळावर आल्यानंतर प्रवाशांना माहिती होते की, विमानाला उशीर आहे. त्यावेळी प्रवासी हतबल होऊन विमानाचे वाट पाहत ताटकळत बसावे लागते. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, मुली यांचे हाल होत आहेत. एकीकडे विमान प्रवास जलद असून, विमानांना होणाऱ्या लेटमार्कमुळे प्रवाशांना मात्र गैरसोयीचा फटका सहन करावा लागत आहे.
ही आहेत विमाने
बुधवारी रात्री १२ वाजता पुण्यावरून लखनऊला उड्डाण करणाऱ्या (इंडिगो ६ इ ३३८) हे रात्री १ वाजता उड्डाण केले. त्यांनतर पुणे ते दिल्लीला सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण करणाऱ्या (स्पाइस जेट -९३७) हे विमान सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी उड्डाण केले. तर पुणे ते बंगळुरू जाणाऱ्या (एअर इंडिया-आयएक्स १०८४) हे सकाळी ८ वाजता उड्डाण करणार होते. परंतु काही कारणाने हे विमान ९:३० मिनिटांनी उड्डाण केले. याशिवाय चेन्नई आणि हैदराबादला जाणाऱ्या दोन विमानांना अर्धातासाहून अधिक वेळ झाला आहे.
विमानतळावर गेल्यावर मिळते माहिती
अनेक वेळा प्रवाशांना विमानांना उशीर झाला तर पाच तास अगोदर मेसेज देणे आवश्यक आहे. परंतु काही विमान कंपन्यांकडून वेळेवर मेसेज पाठविले जात नाही. पाठविले तरी प्रवाशांना तो मिळत नाही. यामुळे प्रवासी घरातून वेळेवर निघतात. परंतु विमानतळावर गेल्यावर त्यांना विमानाला उशीर आहे, असे कळते. त्यामुळे प्रवाशांना दुहेरी त्रास सहन करावा लागतो.