अधिकचा नफा देण्याच्या आमिषाने घातला ४० लाखांचा गंडा, कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By नम्रता फडणीस | Updated: July 9, 2024 16:26 IST2024-07-09T16:26:18+5:302024-07-09T16:26:34+5:30
याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत....

अधिकचा नफा देण्याच्या आमिषाने घातला ४० लाखांचा गंडा, कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : शेअर्स ट्रेडिंगमध्ये नफा मिळविण्याचे प्रलोभन दाखवत मूळ रक्कम आणि परतावा न देता एकाला सायबर चोरट्यांनी ४० लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार १६ मे ते ८ जुलै २०२४ दरम्यान घडला. चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून साडेबारा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकारही समोर आला आहे. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एन.आय.बी.एम. रस्त्यावरील परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार, शेअर्स ट्रेडिंगमध्ये नफा मिळण्याचे आमिष दाखवून काही प्रमाणात नफा फक्त त्यांच्या मोबाइल ॲपमध्ये दर्शवून विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी नफा काढण्याचा प्रयत्न केला असता मूळ रक्कम आणि परतावा असे काही न देता फिर्यादीची ३९ लाख ८० हजार ९७० रुपयांची फसवणूक केली.
टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून ३६ वर्षीय व्यक्तीची साडेबारा लाख रुपयांची फसवणूक केली. आर्थिक सुरुवातीला सायबर चोरट्यांनी थोड्याफार प्रमाणात नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला, त्यानंतर यूपीआय आयडी लिंक असलेल्या विविध बँक खात्यांत १२ लाख ५४ हजार ८९२ रुपये भरण्यास भाग पाडून त्यापैकी ९ हजार रुपये परत करून उर्वरित रक्कम १२ लाख ४५ हजार ८९२ रुपये आजपावेतो परत न करता फिर्यादीची फसवणूक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डिगोळे करीत आहेत.