पुणे : पावसाळ्याचा जोर ओसरत असताना शहरात डेंग्यूचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत शहरात तब्बल डेंग्यूचे ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, २८५ संशयित डेंग्यू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांतच नोंदवलेली ही यंदाच्या वर्षातील सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे.
या वर्षात फेब्रुवारीत ४, एप्रिल व मेमध्ये प्रत्येकी २, जूनमध्ये ४, जुलैमध्ये ११, तर ऑगस्टमध्ये २८ डेंग्यू रुग्ण आढळले होते. त्या तुलनेने सप्टेंबर महिन्यात पंधरा दिवसांतच रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या पंधरवड्यात अधूनमधून झालेल्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून, डासांची उत्पत्ती वाढल्याने डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
संपूर्ण वर्षभरात आतापर्यंत १,६९९ संशयित डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८३ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीत समोर आले आहे. याशिवाय २० चिकुनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू नियंत्रणासाठी महापालिकेने कारवाईचे गाडे हाकले असून, सप्टेंबर महिन्यात डास निर्मितीसाठी कारणीभूत ठरलेल्या २१० आस्थापनांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच नियमभंग केल्याबद्दल २६ हजार ३०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. डेंग्यू हा एडीस एजिप्टी डासामुळे होतो. हा डास स्वच्छ पाण्यात वाढतो आणि दिवसाढवळ्या चावतो. डासांची अळी पाण्यात वाढते. त्यामुळे घर आणि परिसरात पाणी साचू न देणे महत्त्वाचे आहे. डेंग्यूच्या सुरुवातीला साधा ताप वाटतो, पण पुढे गंभीर स्वरूप धारण करू शकतो. वेळेत वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.कोट
डेंग्यूवर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग व मलेरिया सर्वेक्षण अधिकारी घराघरांत जाऊन तपासणी करत आहेत. फॉगिंग, कीटकनाशक फवारणी आणि डासनिर्मूलन मोहिमा मोठ्या प्रमाणावर राबविल्या जात आहेत. संशयित रुग्णांवर योग्य उपचार दिले जात असून, बायो लार्व्हिसाइड्स, कीटकनाशके, औषधे आणि टेस्टिंग किट्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. शहरातील नागरिकांनी घराबाहेर व परिसरात पाणी साचू न देणे, झाकलेली भांडी वापरणे आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे याबाबत आवाहन करण्यात आले आहे. - डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.
डेंग्यूची लक्षणे
अचानक येणारा उच्च ताप. डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना. अंगदुखी, स्नायूंमध्ये व सांध्यांमध्ये वेदना. त्वचेवर लालसर चट्टे अथवा पुरळ येणे. थकवा, भूक मंदावणे. गंभीर अवस्थेत रक्तस्राव, प्लेटलेट्सची संख्या घटणे आदी लक्षणे जाणवताच वैद्यकीय तपासण्या करून घ्या.