फ्लॅटमध्ये ३०० मांजरी ! सोसायटीतील नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांचा हस्तक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 07:36 IST2025-02-18T07:35:45+5:302025-02-18T07:36:16+5:30
मांजरांच्या विष्ठाची प्रचंड दुर्गंधी पसरल्याने फ्लॅटधारकाला ४८ तासांत या मांजरी दुसरीकडे हलवून त्यांची याेग्य देखभाल करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पाेलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.

फ्लॅटमध्ये ३०० मांजरी ! सोसायटीतील नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांचा हस्तक्षेप
पुणे : हडपसर भागातील एका साेसायटीतील फ्लॅटमध्ये तब्बल ३०० मांजरी पाळल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. याबाबत साेसायटीतील नागरिकांनी पाेलिसांकडे तक्रार केल्यानंतर, हडपसर पाेलिस व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित फ्लॅटवर छापा टाकला. मांजरांच्या विष्ठाची प्रचंड दुर्गंधी पसरल्याने फ्लॅटधारकाला ४८ तासांत या मांजरी दुसरीकडे हलवून त्यांची याेग्य देखभाल करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पाेलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.
हडपसर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय माेगले यांनी सांगितले की, हडपसरमधील मार्वल बाऊण्टी काे.-ऑपरेटिव्ह हाैसिंग साेसायटीत फ्लॅट नंबर सी-९०१ मध्ये रिंकू भारद्वाज व रितून भारद्वाज यांनी घरात मांजरी पाळल्याची व त्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास हाेत असल्याची तक्रार पाेलिसांकडे आली. त्यानुसार पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी व महिला पाेलिस यांनी जाऊन पाहणी केली. साडेतीन बीएचके फ्लॅट मध्ये ३०० पेक्षा जास्त मांजरी होत्या. फ्लॅटमध्ये रिंकू भारद्वाज व चार महिला कर्मचारी हाेत्या. मांजरींचे रेबीज लसीकरण तसेच नसबंदी केली नव्हती. काही मांजरी गर्भवती व काही मांजरींना पिल्ले झाली आहेत. त्यांचे काेणत्याही प्रकारचे वैद्यकीय रेकाॅर्ड ठेवलेले नव्हते.