श्री क्षेत्र नारायणपूर येथे ३ दिवस संचारबंदी; दत्तजयंती सोहळा ऑनलाईन पाहण्याची सोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 18:29 IST2020-12-26T18:23:25+5:302020-12-26T18:29:16+5:30
श्री क्षेत्र नारायणपूर येथे प्रतिकात्मक स्वरुपात २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती उत्सव साजरा होणार

श्री क्षेत्र नारायणपूर येथे ३ दिवस संचारबंदी; दत्तजयंती सोहळा ऑनलाईन पाहण्याची सोय
पुणे : श्री क्षेत्र नारायणपूर येथे २७ ते २९ डिसेंबर असे ३ दिवस संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी घेतला आहे. दत्त जयंती उत्सव नारायणपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे या उत्सवासाठी तीन दिवस भाविक जास्त प्रमाणात येण्याची शक्यता आहे. यासाठी नारायणपूर येथे कोविड १९ या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीकोनातून श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी १४४ कलम अन्वये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
पुरंदर तालुक्यात कोरोना प्रसार वाढत आहे. त्यामुळे २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत श्री क्षेत्र नारायणपूर येथे प्रतिकात्मक स्वरुपात दत्तजयंती उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे भाविक भक्तांनी या कालावधीत श्री क्षेत्र नारायणपूर येथे येऊ नये, या तीन दिवसाचे कालावधीत नारायणपूर येथे प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे.
दत्तजयंती सोहळा घरी बसल्या ऑनलाईन पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी भाविकांनी नारायणपूर येथे दत्त जयंती उत्सवास येण्याचे टाळावे, असे पोलीस प्रशासन व मंदीर प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.