पुणे : शहरातील महापालिकेच्या शाळांमध्येसीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
शहरात महापालिकेच्या सुमारे २८०हून अधिक शाळा आहेत. शहरातील सुमारे दीडशे इमारतींंमध्ये त्या भरतात. काही शाळांना मोठी मैदानेही आहेत. तेथे सुरक्षा रक्षक नेमले असले तरी त्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे शाळांच्या परिसरात कचरा टाकणे, शाळेतील साहित्य चोरणे, मैदानात रात्रीच्या वेळी मद्यपी तसेच नशेखोरांचा वावर असणे, गुन्हेगारी कृत्य करणे अशा प्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे शाळांचे नुकसान टाळणे, तसेच हे गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून महापालिका आयुक्तांकडे मागणी करण्यात आली होती.आयुक्तांनी विद्युत विभागाने सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, विद्युत विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याचे कळविले होते. त्यानंतर आता शाळांच्या सुरक्षेचे प्राधान्य लक्षात घेता महापालिकेने शहरात हायड्रो ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अंदाजपत्रकात १२ कोटींची तरतूद केली होती. हा प्रकल्प होणार नसल्याने या निधीतून तीन कोटींचा निधी शाळांना सीसीटीव्ही बसविण्यासाठी वर्गीकरणाद्वारे देण्यात आला आहे.