लोणावळ्यात २४ तासांत २६६ मिमी पाऊस; पावसाचा जोर कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 11:03 IST2019-08-03T10:58:49+5:302019-08-03T11:03:59+5:30
पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात गेल्या २४ तासांत तब्बल २६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

लोणावळ्यात २४ तासांत २६६ मिमी पाऊस; पावसाचा जोर कायम
लोणावळा : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात गेल्या २४ तासांत तब्बल २६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या पात्राला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने ग्रामीण भागात नदीला सर्वत्र पूर आला आहे. वाकसई चाळ, कार्ला, मळवली परिसरातील अनेक सोसायटय़ांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. सांगिसे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला आहे.
पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविणार
मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पिण्याचे पाणी पुरविणारे मावळ तालुक्यातील पवना धरण 98 टक्के भरले असून धरणातून सध्या हायड्रो मार्गे १२०० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने धरणाचे दरवाजे उघडत दरवाजांमधून ३५०० क्युसेक व हायड्रोद्वारे १५५० क्युसेक याप्रमाणे पाण्याचा विसर्ग नऊ वाजल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती पवना धरण शाखा अभियंता यांनी दिली.