सुधारित डीपीमध्ये पीएमपीसाठी २५ जागा
By Admin | Updated: September 30, 2015 01:39 IST2015-09-30T01:39:28+5:302015-09-30T01:39:28+5:30
शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारित विकास आराखड्यात (डीपी) पीएमपीसाठी अच्छे दिन आले आहेत. हा डीपी तयार करण्यासाठी राज्यशासनाने नेमलेल्या

सुधारित डीपीमध्ये पीएमपीसाठी २५ जागा
पुणे : शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारित विकास आराखड्यात (डीपी) पीएमपीसाठी अच्छे दिन आले आहेत. हा डीपी तयार करण्यासाठी राज्यशासनाने नेमलेल्या समितीने पीएमपीसाठी तब्बल २५ ठिकाणी आरक्षणे ठेवली आहेत. १९८७च्या विकास आराखड्यात ही आरक्षणांची संख्या १९ होती तर महापालिकेने याच वर्षी मार्च महिन्यात सादर केलेल्या आराखड्यातही ही संख्या तेवढीच होती. मात्र, शहरातील वाहतूक व्यवस्था आणि इतर दळणवळणांच्या साधनांच्या ठिकाणी पीएमपीची आवश्यक असलेली कनेक्टिव्हीटी ही बाब लक्षात घेऊन ही आरक्षणे वाढविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
तब्ब्बल ३ हजार वाहने आणि १६ हजारांहून अधिक कर्मचारी असलेल्या तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल १२ लाख प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीला गाड्या पार्क करणे, नवीन डेपो विकसित करणे, नव्या सुविधा देणे यासाठी शहरात तब्बल १५५ एकर जागेची आवश्यकता आहे. मात्र, दोन्ही शहरांमध्ये मिळून पीएमपीकडे अवघी ४६ एकर जागा आहे. त्यामुळे पीएमपीच्या हजारो बस रात्री रस्त्यावर उभ्या असतात, तर शहरात प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन डेपोही सुरू करणे पीएमपीला शक्य नाही. त्यामुळे पीएमपीकडून महापालिकेकडे वारंवार जागेची मागणी केली जाते. ही बाब लक्षात घेऊन १९८७च्या शहर विकास आराखड्यात पीएमपीसाठी तब्बल १९ जागा अरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नुकत्याच महापालिकेने प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या सुधारित डीपीमध्येही या आरक्षणातील काही ठिकाणांचे जागा बदल करण्यात आले होते. मात्र, आरक्षणांची संख्या कायम ठेवण्यात आली होती. त्यानंतर मार्च २०१५ मध्ये हा डीपी राज्य शासनाने ताब्यात घेऊन तो अंतिम करण्यासाठी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीसही पीएमपीकडून जागांच्या आरक्षणाबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्याची दखल घेत समितीने पीएमपीसाठीच्या आरक्षणांची संख्या ६ने वाढवून ती आता २५ केली आहे. त्यामुळे भविष्यात पीएमपीची जागेची समस्या काही प्रमाणात सुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)