राज्यातील २४ लाख शिधापत्रिकाधारक डिसेंबरच्या धान्यापासून वंचित

By नितीन चौधरी | Updated: December 31, 2024 20:50 IST2024-12-31T20:48:35+5:302024-12-31T20:50:02+5:30

- धान्य वितरण करण्यासाठी संपूर्ण जानेवारी महिन्याची मुभा देण्याची मागणी

24 lakh ration card holders in the state deprived of December food grains | राज्यातील २४ लाख शिधापत्रिकाधारक डिसेंबरच्या धान्यापासून वंचित

राज्यातील २४ लाख शिधापत्रिकाधारक डिसेंबरच्या धान्यापासून वंचित

पुणे : उशिरा झालेला धान्यपुरवठा तसेच ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबरचे धान्य वितरण रखडले आहे. परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यांतील सुमारे २४ लाख शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळालेले नाही. त्यामुळेच उर्वरित धान्य वितरण करण्यासाठी संपूर्ण जानेवारी महिन्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे. बीड जिल्हा धान्य वितरणामध्ये राज्यात सर्वांत मागे आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ग्रामीण, गोंदिया, वर्धा, फ परिमंडळ ठाणे, ग परिमंडळ कांदिवली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर शहर या जिल्ह्यांत ९० टक्क्यांपेक्षा अधिक वितरण पूर्ण झाले असले तरी अन्य जिल्ह्यांची धान्य वितरणाची टक्केवारी चिंताजनक आहे.

नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे शहर व ग्रामीण या जिल्ह्यांमध्ये क्षेत्रीय पुरवठा कार्यालयांचा नियोजन शून्य कारभार आणि वाहतूक व्यवस्थेतील तांत्रिक त्रुटी या कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून अन्नधान्य निर्धारित वेळेत पोहोचण्यास विलंब होत आहे, असा आरोप महासंघाचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी केला आहे. या जिल्ह्यातील काही दुकानांमध्ये डिसेंबरचे धान्य अजूनही पोहोचलेले नाही. परिणामी धान्य वितरण मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे थेट वाहतूक असणाऱ्या दुकानांमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यातील वाहतुकीसंदर्भातदेखील वारंवार तांत्रिक व प्रशासकीय समस्या उद्भवत आहेत. मागील काही महिन्यांपासून राज्यातील अनेक दुकानांपर्यंत महिन्याचे धान्य महिन्याच्या २५ तारखेनंतर पोहोचत आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

डिसेंबरच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण ६ लाख ८३ हजार ७७६ एपीएल शेतकरी शिधापत्रिकांपैकी (३.९७ टक्के), राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र १ कोटी ६५ लाख ८१ हजार शिधापत्रिकांपैकी आतापर्यंत केवळ १ कोटी ४१ लाख ७१ हजार ५८२ शिधापत्रिकांचे धान्य वितरण पूर्ण झाले आहे. म्हणजेच राज्यामध्ये अजूनही २४ लाख ९ हजार ४१८ शिधापत्रिकांचे धान्य वितरण प्रलंबित आहे. राज्यात अजूनही ३३५ दुकानांचे धान्य वितरण शून्य टक्के आहे, तर ७६८ दुकानांचे धान्य वितरण ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच २ हजार १२० दुकानांचे धान्य वितरण ६० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे.

जानेवारी ते जून या कालावधीमध्ये राज्यात साधारण ४ लाख ६० हजार ६८३ शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल केली नाही. धान्य वितरण प्रलंबित राहण्याची अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे असू शकतात. डिसेंबरमध्ये पुरवठा विभागाकडून क्लाऊड सर्व्हरचे स्थलांतर करण्यात आले. तरीही १५ डिसेंबरपर्यंत अन्नधान्य वितरण सुरळीत झालेले नाही. तसेच आधार सर्व्हरमधील तांत्रिक समस्यांमुळे ई-पॉस मशीनवर धान्य वितरण करतेवेळी अनेक समस्या उद्भवत आहेत. अजूनही ई-पॉस मशीन वारंवार लॉग आऊट होणे, आरडी सर्व्हर रिफ्रेश न होणे या समस्या उद्भवत आहेत.

ज्या शिधापत्रिकाधारकांचे मागील महिन्याचे धान्य प्रलंबित राहिले असेल, अशा शिधापत्रिकाधारकांचे धान्य वितरण पूर्ण करण्यासाठी आवश्यकता असेल त्याच जिल्ह्यांमध्ये १० तारखेपर्यंत कॅरी फॉरवर्ड सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी महासंघाने केली आहे. डिसेंबरमधील प्रलंबित धान्य वितरण पूर्ण करण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ न देता संपूर्ण जानेवारीत वितरण करण्याची परवानगी द्यावी. - गणेश डांगी, अध्यक्ष, पुणे शहर दुकानदार संघटना

Web Title: 24 lakh ration card holders in the state deprived of December food grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.