पुणे : वाढत्या विमान प्रवाशांमुळे आगामी पन्नास ते शंभर वर्षांचा विचार करून पुणेविमानतळाचा विस्तार होणार आहे. त्यासाठी २०० एकर जागेची आवश्यकता असून, त्यातील २५ एकर जमीन सरंक्षण विभागाकडून घेण्यात येणार आहे, तर ६५ एकर खासगी जागेचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. उर्वरित जागेसाठी चर्चा सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.पुणे विमानतळ सल्लागार समितीची बैठक आणि उड्डाण यात्रा कॅफेच्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुरलीधर मोहोळ बोलत होते. यावेळी वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके, आदी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, पुणे विमानतळ धावपट्टीच्या विस्तारासाठी ओएलएस सर्व्हे झाला असून, त्यानुसार सर्व विभागांसोबत बैठकी सुरू आहेत. धावपट्टी विस्तारासाठी साधारण २०० एकर जागेची आवश्यकता आहे. यामध्ये सरंक्षण विभागाकडे २५ एकर जमिनीची मागणी करण्यात आली आहे. त्या बदल्यात संरक्षण विभागाला दुसरीकडे जागा दिली जाणार आहे. या मागणीला सरंक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच, खासगी ६५ एकर जागेबाबत बोलणी सुरू आहे. जागा संपादनाचे काम राज्य सरकारचे आहे. विमानतळाच्या शेजारचा रस्ता विमानतळ परिसरात येणार आहे. त्या रस्त्याला पर्यायी रस्ता तयार करावा लागणार आहे. त्यासाठी महापालिका ६५ कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच कार्गोसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले.
उड्डाण योजना १० वर्षे सुरू राहणार
उड्डाण योजनेंतर्गत छोटी शहरे मोठ्या शहरांना जोडली जात आहेत. गेल्या दोन वर्षांत देशभरात या योजनेंतर्गत दीड कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही योजना पुढील १० वर्षे सुरूच असणार आहे. येत्या पाच वर्षांत या योजनेंतर्गत सुमारे चार कोटी प्रवासी विमान प्रवास करतील, असा विश्वासही मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, २०४७ पर्यंत देशात ४०० विमानतळ होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
विमानतळापर्यंत मेट्रो सेवा
पुणेकरांचा मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात शहराच्या कोणत्याही भागातून विमानतळापर्यंत येता यावे, यासाठी मेट्रोचे जाळे विमानतळापर्यंत जोडले जाणार आहेत. खडकवासला ते खराडी मेट्रो मार्ग पुढे विमानतळाला जोडण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासंदर्भात महामेट्रोला डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मेट्रो विमानतळासोबत जोडली जाईल.