‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या उद्घाटनाची १९५४ मधली चित्रफीत ‘एनएफएआय’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST2021-02-05T05:19:05+5:302021-02-05T05:19:05+5:30

पुणे : लोकमान्य टिळक यांच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ या पुण्यातील प्रसिद्ध शाळेच्या इमारतीचे उद्घाटन १९५४ मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती ...

1954 video of the inauguration of the New English School to NFAI | ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या उद्घाटनाची १९५४ मधली चित्रफीत ‘एनएफएआय’कडे

‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या उद्घाटनाची १९५४ मधली चित्रफीत ‘एनएफएआय’कडे

पुणे : लोकमान्य टिळक यांच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ या पुण्यातील प्रसिद्ध शाळेच्या इमारतीचे उद्घाटन १९५४ मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांनी केले होते. या सोहळ्याची १६ ‘एमएम’मधील दुर्मिळ चित्रफीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाली आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी. ए. कुलकर्णी यांनी हा दुर्मिळ ठेवा संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सोपविला.

या ऐतिहासिक प्रशालेची स्थापना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि महादेव बल्लाळ नामजोशी यांनी केली होती. सुरूवातीच्या काळात अनेक ठिकाणी या शाळेचे स्थलांतर झाले आणि अखेरीस स्वत:च्या जागेतील नव्या इमारतीत ही शाळा आली. सध्याची इमारत पुणे शहराचे भूषण असल्याने ही दुर्मिळ चित्रफित महत्त्वाची आहे. सुमारे दहा मिनिटांच्या या चित्रफितीचे छायाचित्रण पुण्यातील तत्कालिक आर्क फोटो स्टुडिओचे छायाचित्रकार एम. के. कानेटकर यांनी केले आहे.

या दुर्मिळ चित्रफितीत १० जानेवारी १९५४ ला झालेल्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या उदघाटन समारंभाचे छायाचित्रण आहे. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांनी या प्रशालेच्या परिसराची केलेली पाहणी, त्यानंतरचे जाहीर सभेत केलेले भाषण तसेच याच इमारतीच्या वरच्या बाजूस मध्यभागी असलेल्या ‘तारांगण’ या खगोलशास्त्रीय प्रयोगशाळेस त्यांनी दिलेली भेट आदी गोष्टींचे चित्रण उपलब्ध आहे.

या उद्घाटन समारंभास महर्षी धोंडो केशव कर्वे, रँग्लर र. पु. परांजपे, रँग्लर जी. एल चंद्रात्रे, प्राचार्य एन. जी. दामले आदी मंडळी उपस्थित होते. ‘न्यू इंग्लिश स्कूल’ प्रशालेचे तत्कालीन प्राचार्य पी. एन. वीरकर यांनी डॉ. राधाकृष्णन यांचे केलेले स्वागत, इमारतीच्या विविध परिसराची दृश्ये या चित्रफितीमध्ये पाहायला मिळतात. ही दुर्मिळ चित्रफीत मिळाल्याचा आनंद प्रकाश मगदूम यांनी व्यक्त केला.

Web Title: 1954 video of the inauguration of the New English School to NFAI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.