पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील वर्षभरात तब्बल १८ हजार प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केला असून, या प्रवाशांकडून १ कोटीहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
पीएमपीच्या वारंवार प्रयत्नांनंतरही बसमध्ये मोठ्या प्रमाणावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुळसुळाट सुरूच आहे. महामंडळाने १ जानेवारी ते २३ डिसेंबर २०२४ या दरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या महामंडळाने जाहीर केली आहे. त्यानुसार वर्षभरात तब्बल १८ हजारांहून अधिक प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केला असून, पीएमपीने प्रवाशांकडून दंड स्वरूपात एकूण १ कोटी ३३ लाख ६०० रुपयांहून अधिक रक्कम वसूल केली आहे.
पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर त्वरित दंड आकारण्यात येतो. हा दंड ५० रुपये ते ५०० रुपये इतका असून देखील अनेक प्रवाशांकडून विनातिकीट प्रवास करण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे.
तिकीट हरवले तरी ५०० रुपये दंड
पीएमपीकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना ५० ते ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. तुम्ही तिकीट काढले; पण तपासणी वेळी ते हरवले तरी ५०० रुपये दंड भरावा लागतो.
विनातिकीट प्रवासाचे प्रमाण का वाढत आहे?
सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पीएमपी अधिक सक्षम झाली पाहिजे. पीएमपीकडून किफायतशीर दरात सेवा दिली जाते, मात्र तरीही काही प्रवासी नियमांकडे दुर्लक्ष करतात. महामंडळाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवून दंड आकारणी केली जाते, तरीही हा प्रकार कमी होत नाही. प्रवाशांनी नियमांचे पालन करावे व दंड टाळावा.
१ जानेवारी ते २३ डिसेंबर दरम्यान दंड वसुली
- एकूण दंड वसुली -१ कोटी ३३ लाख २८ हजार ६००.- विनातिकीट प्रवासी संख्या -१८ हजार १०४ रुपये.- दैनंदिन दंड - २५ हजार ३५५ रुपये.
दररोज सरासरी ५० प्रवासी करतात विनातिकीट प्रवास
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दररोज सरासरी ४५ ते ५० जण विनातिकीट प्रवास करतात. या आकडेवारीनुसार दररोज सरासरी २५ हजारांपेक्षा अधिक रुपयाची दंड वसुली पीएमपीकडून होत असते.